ऑक्टोबरमध्ये शहर बस "अनलॉक" होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:37 AM2020-09-24T11:37:54+5:302020-09-24T11:39:34+5:30
शहर बस सेवा सुरू झाली तरी पहिल्या टप्प्यात केवळ १० टक्के बस रस्त्यावर धावतील, असे प्रशासक पाण्डेय यांनी नमूद केले.
औरंगाबाद : शहरातील स्मार्ट सिटी बसला मार्च महिन्यात कोरोनामुळे लागलेला ब्रेक आता लवकरच मोकळा होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहर बस सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. पालकमंत्री आणि परिवहनमंत्री यांच्या उपस्थितीत दि. २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
शहर बस सेवा सुरू झाली तरी पहिल्या टप्प्यात केवळ १० टक्के बस रस्त्यावर धावतील, असेही प्रशासक पाण्डेय यांनी नमूद केले. महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जवळपास ४० कोटी रूपये खर्च करून बस खरेदी केल्या होत्या. या बस चालविण्याची जबाबदारी एसटी महामंडळावर सोपविली आहे. करार पद्धतीवर महापालिकेने चालक आणि वाहक घेतले आहेत. भविष्यात चालक आणि वाहकांचे काय करावे, या संदर्भात दि. २९ रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाकडून मुख्य बसस्थानक आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार आहे. या कोट्यावधी रूपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेची बांधकाम परवानगी आवश्यक आहे. बांधकाम परवानगीसोबतच लावण्यात येणारे विकास शुल्क माफ करावे, अशी मागणी महामंडळाने केली आहे. महापालिकेला शहर बससेवेसाठी एका स्वतंत्र बस डेपोची गरज असून महामंडळाने नाममात्र दरात महापालिकेला डेपो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही दि. २९ रोजी होणाऱ्या बैठकीत केली जाणार आहे. या बैठकीत आणखीही काही महत्त्वपूर्ण निर्णय होतील, असा विश्वासही पाण्डेय यांनी व्यक्त केला.