२२ जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:00 AM2018-06-18T01:00:43+5:302018-06-18T01:01:08+5:30
२२ जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या सुरु वातीलाच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, सुरुवातीचे दोन दिवस वगळता जूनचा पहिला पंधरवडा पावसाविनाच सरला आहे. जिल्ह्याच्या आकाशात ढगांची नुसती गर्दी होत असून, अधूनमधून भुरभूर होत आहे. आता २२ जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
उन्हाळ्यातील ४२ अंश सेल्सिअसपर्यंतचे तापमान, ऊन-सावल्यांच्या खेळानंतर १ जूनला रोहिणी नक्षत्रात शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने चांगलीच हजेरी लावली; परंतु हे दोन दिवस सोडले तर पावसाने हुलकावणी दिली आहे. गेल्या पंधरा दिवसांत अधून-मधून पावसाचा केवळ शिडकावा झाला. रविवारीदेखील (दि. १७) शहरातील काही भागांत पावसाने हलकीशी हजेरी लावली. चिकलठाणा वेधशाळेत ०.६ मि. मी. पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात १० किं वा ११ जून रोजी मान्सून दाखल व्हायला हवा होता. गेल्या पंधरा दिवसांत एकीकडे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली, तर दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात अद्यापही पावसाला सुरुवात नाही. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसायोग्य हवामान नसून, मान्सूनसाठीचे अनुकू ल वातावरण १७ जूननंतर असेल. त्यानंतर समाधानकारक पाऊस राहिल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.