पुंडलिकनगरच्या पाण्यावरून राजकीय संघर्षाची चिन्हे; सेना-भाजपच्या दबावामुळे अधिकारी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:19 PM2018-10-02T16:19:42+5:302018-10-02T16:20:48+5:30

पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवरून सिडको एन-३, एन-४ भागात जलवाहिनी टाका असा दबाव, धमक्या भाजप नगरसेवकांकडून देण्यात येत आहेत.

Signs of political conflicts over Pundalnagar water; Officers suffer due to pressure from Army-BJP | पुंडलिकनगरच्या पाण्यावरून राजकीय संघर्षाची चिन्हे; सेना-भाजपच्या दबावामुळे अधिकारी त्रस्त

पुंडलिकनगरच्या पाण्यावरून राजकीय संघर्षाची चिन्हे; सेना-भाजपच्या दबावामुळे अधिकारी त्रस्त

googlenewsNext

औरंगाबाद : पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवरून सिडको एन-३, एन-४ भागात जलवाहिनी टाका असा दबाव, धमक्या भाजप नगरसेवकांकडून देण्यात येत आहेत. पुंडलिकनगर जलकुंभातून एक थेंबही पाणी मिळणार नाही, अशी ताठर भूमिका सेना नगरसेवकांनी घेतली. जलवाहिनीचे काम सुरू केल्यास आमच्यापेक्षा वाईट कोणी नाही, असा इशाराही सेना नगरसेवकांनी सोमवारी महापौरांसमोर दिला. त्यामुळे या प्रकरणात प्रचंड मेटाकुटीला आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विनाकारण आमची मुस्कटदाबी कशासाठी करता, असा सवाल त्यांनी केला. महापौरांनी या प्रकरणात तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या.

सोमवारी दुपारी पुंडलिकनगर भागातील सेना नगरसेवक महापौरांकडे आले. जलवाहिनीचे काम अजिबात सुरू होऊ देणार नाही. नागरिक प्रचंड संतापले आहेत, काही तरी करा अशी मागणी केली. महापौरांनी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना बोलावून घेतले. कोल्हे यांनी नमूद केले की, स्थायी समितीने जलवाहिनी टाकण्यासाठी मंजुरी दिली. आयुक्तांनी मंजुरी दिली. आम्हाला तर काम करावेच लागेल. काम करायचे नसेल तर रद्द करा.

एकजण जलवाहिनी टाका म्हणून धमक्या देत आहेत. दुसरे नगरसेवक नागरिकांसमोर आम्हाला अभद्र भाषेत बोलतात. काम थांबविण्यासाठी जमावाला भडकविण्याचे काम केल्या जाते. विरोध करणाऱ्या सेना नगरसेवकांच्या तोंडावर कोल्हे यांनी नमूद केले की, तुमच्या वॉर्डात अनधिकृत जलवाहिन्या कशा पद्धतीने टाकण्यात आल्या. अनधिकृत नळ कसे दिले हे मला जाहीरपणे सांगायला लावू नका म्हणून नगरसेवक आत्माराम पवार यांना शांत केले. पुंडलिकनगर पाण्याची टाकी बांधताना फक्त साडेतीन एमएलडी पाण्याची मागणी होती. आता पाणी साडेतेरा एमएलडीपर्यंत पोहोचले आहे, पाणी वाटप हा प्रशासनाचा विषय आहे. नगरसेवकांनी त्यात हस्तक्षेप करू नये, असेही कोल्हे यांनी नमूद केले. पाणी प्रश्नावर उफाळलेला वाद बघून महापौरांनी या प्रकरणात तोडगा काढावा, अशी सूचना केली.

५०० मि.मी.ची जलवाहिनी का?
सिडको एन-३, एन-४ भागात सध्या एन-६ येथील पाण्याच्या टाकीवरून ३५० मि.मी. व्यासाच्या लाईनद्वारे पाणी देण्यात येत आहे. पुंडलिकनगर जलकुंभावरून मंजूर करण्यात आलेली ५०० मि.मी. व्यासाची लाईन आहे. सध्या एन-६ येथून पंपिंगद्वारे पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे खर्च वाढतोय. पुंडलिकनगर येथून पाणी दिल्यास पंपिंगचा खर्च वाचणार असल्याचेही कोल्हे यांनी नमूद केले.

Web Title: Signs of political conflicts over Pundalnagar water; Officers suffer due to pressure from Army-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.