कामगार नाक्यावर सन्नाटा, कडक उन्हामुळे आले नाहीत की निवडणुकीच्या कामावर रोजगार?
By साहेबराव हिवराळे | Published: May 2, 2024 07:59 PM2024-05-02T19:59:53+5:302024-05-02T20:00:37+5:30
सातत्याने रोजचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या घरात असल्याने नागरिक घराबाहेर कमी पडत आहेत
छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीचे पडघम वाजले तसे कामगार नाक्यावर रोजंदारीने काम करणाऱ्या मजुरांची संख्या रोडावलेलीच दिसत आहे. त्यातच आजचे तापमान ४० अंश सेल्सियसच्या घरात होते. उन्हामुळे मजूर आले नाहीत की निवडणुकीत सोय होत असल्याने, हा सवाल आहे. निवडणुकीमुळे मजूर नाक्यावर फिरकत नसल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दुपारीही कामगार नाका ओसाड वाटत होता.
एरव्ही शहराच्या आसपास व औद्योगिक क्षेत्रात बांधकामे सुरू असून अनेक जण शहरातील हर्सूल, उस्मानपुरा, शहागंज, शिवाजीनगर, सातारा, देवळाई चौक, सिडको एन-३ कामगार नाक्यावर जाऊन मजूर नेतात. बांधकाम, खोदकाम, तसेच रस्ता, सिमेंट खडीकरण व माळीकामासाठीही मजुरांना बांधकाम व्यावसायिक रोजाने हजेरीवर नेतात. पण सध्या नाक्यावर मजुरांची संख्या रोडावली असून ते नाक्यावर फिरकताना दिसत नाहीत. दुकानदार व व्यावसायिकांना विचारणा केली असता मजूर वाटेल तेव्हा येतात अशा प्रतिक्रिया मिळाल्या. अनेक मजूर निवडणुकीच्या प्रचार कार्यालयात दिसतात.
उन्हाचा देखील परिणाम
सध्या राजकीय वातावरण उन्हासारखेच अधिक तापत असल्याने कामगार नाक्यावर बांधकाम व्यावसायिकांना मजुरांची कमतरता भासत आहे. काही जण गावाकडे मतदानालाही गेले आहेत, ते अद्याप आलेले नाहीत. सध्या आपल्या जिल्ह्यातही राजकीय घडामोडी जोरात सुरू असल्याने ओळखीचे कार्यकर्ते त्यांना कामास नेत आहेत.
- प्रेम चव्हाण, कामगार नेता
शेवटी जेथे मजुरी, तिकडे कल...
काम मिळावे यासाठी खेड्यापाड्यातून आलेल्या हंगामी मजुरांना रोजीरोटीसाठी सतत धावपळ करावीच लागते. पाणीटंचाई असल्याने बांधकामदेखील कमी झाले आहेत. शेवटी हाताला जे काम मिळेल, तिकडे कल असतो.
-फकीरचंद अवचरमल, कामगार नेता