उंडणगाव येथे मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:39 AM2019-02-10T00:39:57+5:302019-02-10T00:40:07+5:30
प्रणाली जाधव आत्महत्या प्रकरण : गाव १०० टक्के बंद; विविध मागण्यांचे निवेदन सादर
उंडणगाव : प्रणाली जाधव अमर रहे, नराधम लिपिकाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, शालेय मुलींना सुरक्षित शिक्षण मिळावे, या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाचा तपास प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावा आदी घोषणा देत येथे शनिवारी मूकमोर्चा काढून गावात १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. या मूकमोर्चात शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनींसह संपूर्ण गाव सहभागी झाले होते.
उंडणगाव येथील विद्यार्थीनी प्रणाली कृष्णा जाधव हिने ५ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयातील एका लिपिकाच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी येथे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून मूकमोर्चात सहभाग घेतला. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयापासून या मूकमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात विविध घोषणांनी प्रत्येकाचे मन हेलावून गेले होते. मोर्चात शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, तरूण, तरूणी, गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील बाजारपेठ भागातील मारुती मंदिरासमोर मोर्चा आल्यानंतर विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून विविध समस्या व मुलांपासून होणाºया त्रासाचा पाढाच वाचला. यानंतर विद्यार्थिनींच्याच हस्ते अजिंठा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर, नायब तहसीलदार सोनवणे, तलाठी कदम यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात प्रत्येकाने डोक्याला काळ्या फिती लावल्या होत्या.
मूकमोर्चातील प्रमुख मागण्या
या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी,या प्रकरणाचा तपास प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात यावा,
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सुरू करावी, दामिनी पथकाची स्थापना करून मुलींचे रक्षण करावे, प्रणाली जाधवच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया लिपिकास कठोर शिक्षा व्हावी.