व्यापाºयांचा मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:03 AM2017-09-12T01:03:37+5:302017-09-12T01:03:37+5:30
विविध मागण्यांसाठी व्यापारी आणि समाजबांधवांच्यावतीने सोमवारी जालन्यात मूकमोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मागील महिन्यात अंबड येथे झालेल्या गोविंद गगराणी खून प्रकरणाचा निषेध नोंदवितानाच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी आणि आरोपींना कठोर शासन व्हावे यासह विविध मागण्यांसाठी व्यापारी आणि समाजबांधवांच्यावतीने सोमवारी जालन्यात मूकमोर्चा काढण्यात आला. शिवाजी पुतळा ते मामा चौकापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात व्यापारी बांधवांसह महिला व मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मोर्चाच्या समारोपप्रसंगी स्व. गोविंद गगराणीच्या बहिणींनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी केली. त्यांच्या भावना ऐकताना उपस्थितांना अधिकच गहिवरुन आले. शालेय जीवनातून महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत दाखल झालेल्या गोविंद गगराणीच्या खूनाची घटना खंडणीच्या कारणावरुन घडल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. खूनाच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासह आरोपींना कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी यापूर्वीच जिल्ह्यातील अंबड, परतूर, जाफराबाद आदी ठिकाणी मुकमोर्चा निघाला आहे. जालन्यातही मोर्चाच्या माध्यमातून या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळा येऊन राममंदिर चौक, टांगास्टॅण्ड, सिंधी बाजारमार्गे निघालेला हा मोर्चा दुपारी साडेबारा वाजता मामा चौकात पोहोचला. मूकमोर्चात उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. अरविंद चव्हाण, संजय खोतकर, संतोष सांबरे, भाजपचे भास्कर दानवे, डॉ. सुभाष अजमेरा, उद्योजक किशोर अग्रवाल शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, यांच्यासह व्यापारी बांधव सहभागी झाले होते.