जिल्ह्यात राबविणार रेशीम अभियान...!
By Admin | Published: March 6, 2017 12:41 AM2017-03-06T00:41:07+5:302017-03-06T00:44:29+5:30
जालना : रेशीम मार्केटच्या प्रस्तावानंतर आता जिल्ह्यातील तुती (रेशीम) लागवडीत वाढ व्हावी म्हणून ३७ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली
जालना : रेशीम मार्केटच्या प्रस्तावानंतर आता जिल्ह्यातील तुती (रेशीम) लागवडीत वाढ व्हावी म्हणून ३७ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून, त्या माध्यमातून रेशीमचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.
पारंपरिक पिकासोबतच नगदी व कमी वेळेत व जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून तुती लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. यामुळेच जालना येथे रेशीम क्लस्टची संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. याविषयी अधिक माहिती देताना रेशीमचे प्रादेशिक उपसंचालक दिलीप हाके म्हणाले, मार्केटसोबतच रेशीम क्षेत्र वाढाविण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. जालना जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी ३७ गट कार्यरत आहेत. एक गटात दहा ते बारा शेतकरी आहेत. मराठवाड्यात ३ हजार ९०० एकर एवढे तुतीचे क्षेत्र आहे. यात ३ हजार शेतकरी व तेवढेच शेतकरी व रेशीम व्यावसायिक जोडलेले गेलेले आहेत.
शेतकऱ्यांना रेशीम शेती व तुती लागवडीसाठी लागणारी माहिती, अनुदान व प्रशिक्षण जिल्हा कार्यालयातून देण्यात येत असून, शेतकरी गटाच्या माध्यमातून याचा विस्तार होत आहे. तुती पिकाची १७ ते २० दिवसांत वाढ होते. अल्प दिवसांत येणाऱ्या पिकाची शेतकऱ्यांनी लागवड करावी म्हणून संपूर्ण जिल्हाभरात रेशीम शेती अभियान राबविण्यात येणार आहे.
रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून, जिल्ह्यात १५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रेशीम शेती करण्यात येते. जालना येथे होत असलेल्या रेशीम मार्केटचा विकास व्हावा या उद्देशासाठी रेशीम अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे. रेशीम उत्पादन वाढल्यास त्याची विक्री थेट जालन येथील बाजारपेठेत करण्यात येणार आहे. सोबतच उत्पादन वाढीमुळे कर्नाटक राज्यातील व्यापारी रेशीम कोष खरेदीसाठी जालना बाजारपेठेत येऊन महसुलात वाढ होऊन शेतकऱ्यांचा याचा फायदा होण्याचा अंदाज रेशीम अधिकारी व्यक्त करीत आहेत. वर्ष अखेरी रेशीम क्लस्टर सुरू होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)