५० टक्क्यांनी वाढले रेशीमक्षेत्र
By Admin | Published: June 22, 2017 11:23 PM2017-06-22T23:23:17+5:302017-06-22T23:24:30+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील बरेच शेतकरी पारंपरिक पिकाला बगल देत रेशीम शेतीकडे वळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील बरेच शेतकरी पारंपरिक पिकाला बगल देत रेशीम शेतीकडे वळले आहेत. जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयाकडून ३०१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. त्यापैकी २२४ शेतकऱ्यांच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. यंदा रेशीम शेतीत ५० टक्क्याने वाढ झाली आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पारंपारीक पिकाचे नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. पाचही तालुक्यातील ३०१ शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी जिल्हा कार्यालयात नोंद केली आहे. यात औंढा, वसमत तालुक्यातील जांब येथे २५, शिंदगी ३०, पांगरा शिंदे ३८, गुंज २५ आणि डिग्रस बु. येथे २५ , तर सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातील धानोरा ३३, वडहिवरा ४२, भोगाव २६, सवड ११ आणि कडती २६ अशा एकूण ३०१ शेतकऱ्यांची निवड केली आहे. निवडलेल्यांपैकी २२४ शेतकऱ्यांच्या प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली. तर प्रस्तावांना कळमनुरी तहसीलदारांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हिंगोली, वसमत, सेनगाव येथील १४९ शेतकऱ्यांची माहितीव प्रस्ताव संबंधित तहसीलदारांकडे पाठवूनही मंजुरी दिली नसल्याने पुढील कारवाई थांबली आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजून तरी तुती लावगडीस सुरुवात झालेली नाही. मात्र जुलै महिन्यात तुती लावगडीस गती येणार आहे. त्यापूर्वी या प्रस्तावांना मंजुरी देणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास तुतीचे क्षेत्र दुप्पट होण्यास मदत होणार आहे. मनरेगा योजनेत लागवडीचे काम करावे लागत असल्याने त्यास तहसीलदारांची मंजुरी आवश्यक आहे.
जिल्हा रेशीम उद्योग कार्यालयात ६ पदे मंजूर असले तरी केवळ दोघांवरच जिल्ह्याची मदार आहे. यात एक व्यवस्थापक आहेत. तर दुसरा कर्मचारी. दिवसेंदिवस शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत असल्याने या कार्यालयात माहिती विचारण्यास येत आहेत. मात्र शेतकऱ्यांना माहिती देणेही कठीण होत आहे.