साडीत रेशीम धागा अन् सोनेरी मुलामा; शालिवाहन राजाच्या नगरीची ‘पैठणी’ गेली सातासमुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 01:54 PM2024-02-05T13:54:45+5:302024-02-05T13:55:47+5:30

गेली दोन हजार वर्षांपासून पैठण हे या कलेचे केंद्र म्हणून ओळखले जाते.

silk thread and gold plating for saree; 'Paithani Saree' of the city of the ancient Shalivahana king demands across world | साडीत रेशीम धागा अन् सोनेरी मुलामा; शालिवाहन राजाच्या नगरीची ‘पैठणी’ गेली सातासमुद्रापार

साडीत रेशीम धागा अन् सोनेरी मुलामा; शालिवाहन राजाच्या नगरीची ‘पैठणी’ गेली सातासमुद्रापार

- अनिलकुमार मेहेत्रे
पैठण :
एकेकाळी शालिवाहन राजा राज्य करीत असलेल्या तालुक्यात रेशीम धाग्यापासून सोनेरी मुलामा असलेली पैठणी साडी तयार केली जात असे, अत्यंत लोकप्रिय असलेल्या या पैठणीची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. वर्षाला दोनशे साड्या येथे तयार केल्या जात असून, यातून अनेक कुटुंबांना कायमचा रोजगार मिळत आहे.

या साडीमुळे पैठणमध्ये बऱ्याच गल्लींचे नाव प्राचीन काळानुसार आहे. जसे तार गल्ली, जर गल्ली, रंगार गल्ली. महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट पारंपरिक प्रकार म्हणजे पैठणी साडी. ही गर्भरेशमी असून, तिचा पदर संपूर्ण जरीचा आणि काठ रुंद व ठसठशीत वेलबुट्टीचे असतात. पैठणी ओळखण्याची खूण म्हणजे तिची डिझाईन पुढून व मागून सारखीच दिसते. विवाहाप्रसंगी नववधूचा शृंगार व इतर मंगलकार्यात गृहलक्ष्मीचा साज पैठणीनेच पूर्ण होतो, अशी आपली परंपरा आहे. गेली दोन हजार वर्षांपासून पैठण हे या कलेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. प्रतिष्ठान-पैठण नावावरूनच पैठणी हे नाव या महावस्त्राला प्राप्त झाले.

पेशवाईच्या ऐन भरभराटीच्या काळात पैठणीचे भाग्य अधिकच उजळले. सोन्याच्या वापरामुळे पैठणी अधिकच भरदार व वजनी बनली. महाराष्ट्र शासनाने या कलेचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरविले. १९६८ साली पैठण येथे एक पैठणी उत्पादन केंद्र सुरू केले. १९७४ पासून पैठणी उद्योगाचा विकास करण्याचे काम शासनाने महाराष्ट्र लघु उद्योग विकास मंडळाकडे सोपविले. या मंडळाने पैठण व येवला या दोन्ही ठिकाणच्या विणकरांना उत्तेजन देऊन पैठणीनिर्मितीचे कार्य पुन्हा जोमाने सुरू केले. त्यात मंडळास यशही लाभले. प्रत्येक स्त्रीला आपल्याकडे एक तरी पैठणी असावीच असे वाटते. काळ बदलला तरी पैठणीचा महिमा काही कमी झालेला नाही.

पैठणला ५ एकर जागेवर २००५ साली २ एकरांत इमारत उभारण्यात आली. त्यामध्ये ‘मऱ्हाठी’ पैठणीनिर्मिती उद्योग हा राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने चालतो. शासनाच्या हस्तकला व उद्योग विभागांशी जोडलेला आहे. येथे २०४ हातमाग असून, ५२ विणकर महिला पैठणी तयार करतात. त्यांना डिझाईननुसार मजुरी दिली जाते.

दिवंगत इंदिरा गांधींनीही दिली होती भेट
आमच्या पैठणी केंद्रास तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनीही भेट देऊन पैठणी साडीची खरेदी केली होती, अशी माहिती केंद्राचे प्रमुख संजय कोठूरकर यांनी दिली.

मजूर म्हणतात...पेन्शन सुरू करा
पैठणी साडी केंद्रातील फर्जना शेख म्हणाल्या की, मी या पैठणी साडी केंद्रामध्ये तब्बल तीस वर्षांपासून काम करत आहे. आम्ही मजुरीवर काम करतो. शासनाने आम्हाला पेन्शन सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: silk thread and gold plating for saree; 'Paithani Saree' of the city of the ancient Shalivahana king demands across world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.