हातपाय अन् मणका मोडला; चिमुकलीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 22:11 IST2025-03-31T22:10:53+5:302025-03-31T22:11:42+5:30
घरात सु-शी करते म्हणून दत्तक घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीला १५-१५ दिवस उपाशी ठेवायचे.

हातपाय अन् मणका मोडला; चिमुकलीची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी देण्याची मागणी
श्यामकुमार पुरे/सिल्लोड: शहरातील आयात या ४ वर्षीय मुलीची पती-पत्नीनेच २६ मार्चच्या मध्यरात्री ३ वाजता निर्घृण हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात ज्या बापाने तिला विकले, त्यालाही सिल्लोड शहर पोलिसांनी सहआरोपी केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, अब्दुल नसीम या बापाने पोटच्या चारवर्षीय चिमुकल्या आयातला दारूच्या नशेत सांभाळ होत नसल्याने पाच हजारात विकले होते. तर शेख फहिम व फौजिया यांनी मूल होत नसल्याने आयतला साध्या कागदावर सही करुन दत्तक घेतले. मात्र, आयातला काही समजत नसल्याने ती घरात कुठेही सु व शी करायची. ती साफ सूप राहत नाही, घरात घाण करते, म्हणून फौजिया आयतला नेहमी बेदम मारायची.
या मारहाणीत तिचे हात-पाय, पाठीचे मणके, गाल, छातीला पाच ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. तर वडील शेख फहिम हा तिला वाईट हेतूने हाय लावायचा, अंगावर ठीक ठिकाणी चिमटे घ्यायचा. शरीरावर अनेक फ्रॅक्चर झाल्याने रडणाऱ्या आयतवर उपचार करण्याऐवजी, का रडते म्हणून दोघेही निर्दयीपणे मारायचे. घरात घाण करते म्हणून तिला आठ-आठ दिवस उपाशी ठेवायचे. या सर्व कृत्यामुळे २६ मार्च रोजी रात्री ३ वाजता आयातने शेवटचा श्वास घेतला.
याप्रकरणी आरोपी शेख फहिम शेख अय्युब( वय ३५ वर्षे) ,फौजिया शेख फहिम (वय २७ वर्षे रा.सिल्लोड) हे या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून, अब्दुल नसीम अब्दुल कयूम (वय ४१ वर्षे रा.जालना) या सख्या बापाला पोलिसांनी सह आरोपी केले आहे. या गुन्ह्यात ज्या व्यक्तीने तिला विकण्यात व विकत घेण्यास मध्यस्ती केली, त्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.
अजिंठ्यातून घरदार विकून सिल्लोडला आले
अजिंठा येथे आरोपी पती-पत्नी आयतचा छळ करायचे, त्यामुळे शेजारी लोक व शेख फईमचे भाऊ भावजयी दोघांना नेहमी रागवायचे. सांभाळ होत नसेल, तर तिला सोडून द्या, असे म्हणायचे. यानंतर दोघांनी अजिंठा येथील घर विकून १५ दिवसांपूर्वी सिल्लोडमध्ये राहायला आले होते. येथे येताच आयतचा मृत्यू झाला. कुणाला काही कळणार नाही, तिचा आपण दफनविधी करून टाकू असे त्यांना वाटले. पण शेजारी असलेल्या लोकांना संशय आल्याने त्यांनी सिल्लोड पोलिसांना फोन केला व हा प्रकार समोर आला.
सिल्लोड तालुक्यात संताप
ईदनिमीत्त सिल्लोड शहरात शुभेच्छा जाहिरात सोबत नागरिकांनी त्या दोघा जल्लाद आरोपींना फाशीची शिक्षा द्या, असे फलक ठीक ठिकाणी लावल्याचे पाहायला मिळाले.