घाटनांद्रा मार्गे सुरू केलेली सिल्लोड-धुळे बससेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:05 AM2021-01-22T04:05:42+5:302021-01-22T04:05:42+5:30
घाटनांद्रा : काही दिवसांपासून प्रवाशांसाठी असलेली सिल्लोड-धुळे बससेवा सुरू करण्याची मागणी सिल्लोड आगाराने पूर्ण केली; मात्र पंधरा दिवसातच ही ...
घाटनांद्रा : काही दिवसांपासून प्रवाशांसाठी असलेली सिल्लोड-धुळे बससेवा सुरू करण्याची मागणी सिल्लोड आगाराने पूर्ण केली; मात्र पंधरा दिवसातच ही बस पुन्हा बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. घाटनांद्रा ते पाचोरा रस्त्यावर सिल्लोड आगाराची सकाळची सिल्लोड-पाचोरा ही एकमेव बस सुरू आहे. सिल्लोड-पाचोरा या बसला प्रवाशांची रोजच मोठी गर्दी असते. या मार्गावर बसेसची संख्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्यात सिल्लोड ते धुळे ही बस सुरू करण्यात आली. पंधरा दिवसच ही बससेवा सुरू राहिली. अचानक बस बंद झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.
सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठे व जिल्ह्याच्या सीमेवर असलेले गाव म्हणून घाटनांद्र्यांची ओळख आहे. हे गाव कन्नड सोयगाव सिल्लोड या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर येत असल्याने या तालुक्यातील विविध गावांना जाण्यासाठी येथील बसस्थानकावर नेहमी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सकाळची नऊ वाजेची सिल्लोड पाचोरा बस निघून गेल्यावर एकही बस या रस्त्यावर नसते. चार तासांनंतर दुसरी बस येईपर्यंत प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे खासगी वाहनाने प्रवाशांना जावे लागते. परिणामी, आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. शिवाय वेळही वाया जातो. सध्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. खान्देश भागात जाण्यासाठी बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी राहत आहे.
---------------
लांबच्या पल्ल्याची नाही बस, बस सुरू करा
घाटनांद्रा परिसरातील छोटी छोटी गावे असल्याने या ठिकाणाहून बरेच प्रवासी धुळे पारोळा व धुळ्याहून पुढे सुरत, नाशिक, गुजरात, राजस्थान, मुंबई आदी ठिकाणी जाण्यासाठी येऊन थांबतात; परंतु येथून एकही लांब पल्ल्याची बस नसल्याने त्यांची तारांबळ होत आहे. सिल्लोड-धुळे ही बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नीलेश बिसेन, शिवनाथ चौधरी, गणेश निकम, रंगनाथ मोरे, आकाश मोरे, राजू गायकवाड, शांतलिंग कोठाळे आदींनी केली आहे.
------
फोटो :