छत्रपती संभाजीनगरात लिंगनिदानानंतर गर्भपातासाठी सिल्लोडवारी; डॉक्टर बंधूंची कसून चौकशी

By सुमित डोळे | Published: May 17, 2024 11:44 AM2024-05-17T11:44:40+5:302024-05-17T11:47:40+5:30

रात्री उशिरापर्यंत सिल्लोडमध्ये पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई : शहरासह सिल्लोडला एजंटांचे मोठे जाळे

Sillod for abortion after sex diagnosis in Chhatrapati Sambhajinagar; investigation of the doctor brothers | छत्रपती संभाजीनगरात लिंगनिदानानंतर गर्भपातासाठी सिल्लोडवारी; डॉक्टर बंधूंची कसून चौकशी

छत्रपती संभाजीनगरात लिंगनिदानानंतर गर्भपातासाठी सिल्लोडवारी; डॉक्टर बंधूंची कसून चौकशी

छत्रपती संभाजीनगर / सिल्लोड : गारखेड्यातील लिंगनिदानाचे जाळे अखेर धक्कादायकरीत्या गर्भपातापर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी पुंडलिकनगर पोलिसांनी यात सिल्लोडच्या सराफा मार्केटमधील एका संशयित डॉक्टरसह त्याच्याकडे काम करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साहित्य जप्त करून चाैकशी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत पुराव्यांचा शोध सुरू होता. महापालिकेने रविवारी छापा टाकला, तेव्हा तेथे दोन कारमधून दोन महिला गर्भलिंग निदानासाठी आल्या होत्या. त्यांचे कार क्रमांक महापालिकेच्या पथकाने पोलिसांना दिले असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी महानगरपालिका व पुंडलिकनगर पोलिसांनी गारखेड्यात राजरोस सुरू असलेले गर्भलिंग निदान सेंटर उघडकीस आणले. सविता थोरात, तिची मुलगी साक्षी, सदाशिव काकडे, धर्मराज नाटकर, कृष्णा नाटकर यांना अटक करण्यात आली. सध्या कारागृहात असलेला व मराठवाड्यात गर्भलिंग निदानाचे रॅकेट चालवणाऱ्या डॉ. सतीश सोनवणेशी रॅकेटचा संबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी त्यांच्यासाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या एका रुग्णालयाचा जनसंपर्क अधिकारी सतीश किसनराव सेहेरे (रा. पिसादेवी) याला निरीक्षक राजेश यादव यांच्या पथकाने अटक केली. १७ मेपर्यंत पोलिस कोठडीत असलेल्या या सर्व आरोपींची पोलिस चौकशी करत आहेत.

सिल्लोडच्या डॉक्टरची चौकशी
बुधवारी सेहरेला ताब्यात घेताच गर्भपाताच्या नव्या रॅकेटचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. गुरुवारी निरीक्षक राजेश यादव, दोन पोलिस पथके व आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकासह सिल्लोडला गेले. दुपारी त्यांनी सेना भवन परिसरातून एका नामांकित डॉक्टरसह त्याच्याकडे काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी सिल्लोड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पाचही जणांची सायंकाळपर्यंत स्वतंत्र चौकशी सुरू होती. सदर डाॅक्टरच्या रुग्णालयातून पोलिसांनी काही इलेक्ट्रॉनिक, मेडिकलचे साहित्य जप्त केले.

तालुक्यात सातत्याने शिबिरे
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोडच्या सेनाभवन परिसरात संशयित डॉक्टरचे रुग्णालय आहे. अनेक वर्षांपासून त्याचा सिल्लोड तालुक्यात हा व्यवसाय आहे. तो नेहमी सिल्लोडच्या आसपासच्या खेडेगावांमध्ये शिबिरे घेतो. त्या कॅम्पद्वारेच तो गर्भलिंग निदान व गर्भपातासाठी महिला हेरत असल्याचा संशय आहे.

महापालिकेने पुरावे सोपवले
दरम्यान, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी पारस मंडलेचा यांनी पुंडलिकनगरचे निरीक्षक राजेश यांना तपासाच्या अनुषंगाने दोन पत्रे पाठवली आहेत. सोबतच घटनास्थळावरच्या काही व्हिडीओंचा पेन ड्राइव्हदेखील सुपुर्द केला आहे. साक्षीकडे आढळलेल्या टॅब व लॅपटॉपचा फाॅरेन्सिककडून तपास करण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. त्यातून मिटवलेला डेटा रिकव्हर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल. दरम्यान, मंडलेचा यांनी छापा मारला तेव्हा गर्भलिंग निदान करून आलेले दाम्पत्य कारमधून पसार झाले. त्या कारचे क्रमांकही त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

Web Title: Sillod for abortion after sex diagnosis in Chhatrapati Sambhajinagar; investigation of the doctor brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.