लसीकरणात सिल्लोडची पिछाडी, तर फुलंब्रीची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:04 AM2021-07-11T04:04:36+5:302021-07-11T04:04:36+5:30
औरंगाबाद : कोरोनाचे प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांतून उत्साह असताना लसींचा तुटवडा नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. एकीकडे लसीकरणासाठी सर्वच स्तरातून आवाहन ...
औरंगाबाद : कोरोनाचे प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांतून उत्साह असताना लसींचा तुटवडा नागरिकांना अडचणीचे ठरत आहे. एकीकडे लसीकरणासाठी सर्वच स्तरातून आवाहन केले जात असताना ग्रामीण भागात पहिल्या डोसमध्ये सिल्लोड तालुका पिछाडीवर असून, उद्दिष्टाच्या केवळ १३.३० टक्के लसीकरण तिथे झाले आहे. तर सर्वाधिक लसीकरण फुलंब्री तालुक्यात १९.३६ टक्के झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात ३१.४२ टक्के, तर ग्रामीण भागातील नऊ तालुक्यांत १९.३६ ते १३.३० टक्के दरम्यान लसीकरण झाले आहे. जिल्ह्यातील एकूण पहिल्या डोसचे लसीकरण २१९१ झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात हेल्थकेअर वर्करच्या लसीकरणाने सुरू झालेल्या लसीकरणानंतर फ्रंटलाइन वर्कर, त्यानंतर ६०पेक्षा अधिक, ४५ वर्षांच्या पुढील, त्यानंतर ३० वर्ष, तर आता १८ वर्षांपुढील लसीकरण सध्या सुरू आहे. शहरात १२२, तर ग्रामीण भागात ७३ ठिकाणी लसीकरणाची सुविधा देण्यात आली आहे. पहिला डोस ७ लाख २२ हजार ८५१ जणांनी, तर दुसरा डोस १ लाख ९९ हजार ३११ जणांनी घेतला असून, आतापर्यंत एकूण लसीकरण ९ लाख २२ हजार १६२ झाले आहे. सोयगाव, गंगापूर तालुक्यातील लसीकरणाचा टक्काही घसरल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
--
मनपा हद्दीत ३१.४२ टक्के लसीकरण
महापालिका क्षेत्रात ११ लाख ७६ हजार ९९९ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ३ लाख ६९ हजार ८५२ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला. हे प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. ३१.४२ टक्के लसीकरण शहरात महापालिका हद्दीत झाले आहे.
---
आठ जुलैपर्यंत लसीकरणाची टक्केवारी
तालुका-पहिला डोस
महापालिका क्षेत्र-३१.३२ टक्के
फुलंब्री-१९.३६ टक्के
खुलताबाद-१८.७५ टक्के
पैठण-१७.९७ टक्के
वैजापूर-१७.९२ टक्के
औरंगाबाद-१७.७६ टक्के
कन्नड-१७.२६ टक्के
सोयगाव-१६.७८ टक्के
गंगापूर-१३.८५ टक्के
सिल्लोड-१३.३० टक्के
एकूण-२१.९१ टक्के
---