सिल्लोडच्या मिरचीचा ठसका देश-विदेशात; आता जीआय मानांकनासाठी येणार केंद्रीय पथक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 06:38 PM2024-01-29T18:38:13+5:302024-01-29T18:38:26+5:30
चेन्नई येथील जीआय केंद्रीय तज्ज्ञांचे पथक परीक्षणासाठी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव या गावशिवारांत येणार आहे.
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तिखटपणा अधिक आणि टिकण्याची क्षमता जास्त असल्याने राज्यभर नावलैकिक मिळविलेल्या सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव येथील मिरचीला जीआय मानांकन देण्याच्या अनुषंगाने चेन्नई येथील जीआय केंद्रीय तज्ज्ञांचे पथक लवकरच परीक्षणासाठी येणार आहे.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव शेतशिवारात मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील मिरची चवीला अधिक तिखट असून ती अधिक काळ टिकते. त्यामुळे या मिरचीची राज्यभर ओळख आहे. या भागातील उष्ण व दमट हवामान, जमिनीची काळी पोत, जमिनीत झिंक, मँगनीज, फॉस्फरस व ह्युमिक ॲसिडचे प्रमाण अधिक असल्याने मिरचीत कॅपसेनॉईड घटक अधिक आढळला आहे. ही मिरची बुरशीला लवकर दाद देत नाही. कॅपसेनॉईडमुळे मिरचीची पँजन्सी अधिक होते. पँजन्सीमध्ये नाकाला झोंबणारा उग्र वास, तिखट चव, त्वचेला स्पर्श झाल्यावर लाही लाही होणे ही बाब विचारात घेतली जाते. सिल्लोड येथील अभिनव प्रतिष्ठानचे किरण पवार व डॉ. संतोष पाटील यांनी याबाबत एक प्रस्ताव पाठवून सदर बाब केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर मिरचीला मानांकन मिळवून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने लवकरच चेन्नई येथील जीआय केंद्रीय तज्ज्ञांचे पथक परीक्षणासाठी सिल्लोड तालुक्यातील आमठाणा, शिवना, गोळेगाव या गावशिवारांत येणार आहे.
विदेशांतही केली जाते निर्यात
सिल्लोड तालुक्यातील मिरचीची पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश तसेच उत्तर भारत, मुंबई या देशांतील भागासह दुबई, पाकिस्तान, बांगलादेश व अरब देशांतही निर्यात केली जाते. दरम्यान, आजवर राज्यातील देवगड हापूस, नाशिकची द्राक्षे, जळगावची केळी व भरीत वांगी, वाहेगाव हळद, अलिबागचा पांढरा कांदा, नागपुरी संत्री, आदी राज्यातील ३४ उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले आहे. आता सिल्लोड तालुक्यातील मिरचीची त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.