ओढ्यात पोहणे जीवावर बेतले; एकाच वस्तीतील तीन मुलांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:09 PM2019-06-28T13:09:40+5:302019-06-28T13:14:26+5:30
सिल्लोडमध्ये मागील वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती
सिल्लोड (औरंगाबाद ) : सिल्लोड शहरातील यशवंतनगरजवळ सय्यद अलाउद्दीन यांच्या दर्गाशेजारील ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता घडली.अबरारखा मुश्ताकखा पठाण (११), अनसखा अमजदखा (१४) व मोईज हारुण शाह (१२, सर्व रा. यशवंतनगर झोपडपट्टी, मोहंमदिया कॉलनी, सिल्लोड) अशी बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.
बुधवारी रात्री सिल्लोड शहरासह तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने ओढ्यातील खड्डे व शिवडीत चांगलेच पाणी जमा झाले होते. गुरुवारी या कॉलनीतील सहा मुले या ओढ्याकडे गेले असता यातील तिघांना पोहण्याचा मोह आला आणि ते जिवाला मुकले. तिघे जण पाण्यात बुडत असल्याचे पाहून घाबरलेली सोबतची तिन्ही मुले धावत वस्तीकडे गेली व त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली. वस्तीतील नागरिक ओढ्याजवळ पोहोचेपर्यंत तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
गरीब कुटुंबातील मुले
मुलांच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांनी तिन्ही मुलांना पाण्याबाहेर काढून सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत मुले एकाच वस्तीतील रहिवासी असून, गरीब कुटुंबातील आहेत. यातील अबरारखा मुश्ताकखा पठाण व अनसखा अमजदखा हे मामेभाऊ आहेत. सायंकाळी तिन्ही मुलांवर येथे शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षीची पुनरावृत्ती
गेल्या वर्षीही पावसाळ्यात सिल्लोड शहरातील रजाळवाडी पाझर तलावावर पोहायला गेलेल्या सिल्लोडमधीलच तीन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.