औरंगाबादच्या तेजसने जिंकले खेलो इंडिया युथ गेम्समध्ये रौप्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:49 AM2019-01-12T00:49:10+5:302019-01-12T00:49:42+5:30
: पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत औरंगाबादचे खेळाडू दिमाखदार कामगिरी करण्याची मालिका सुरू आहे. या स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये ४ पदकांची लयलूट करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू सिद्धी व रिद्धी हत्तेकर यांच्यानंतर आजचा दिवस तेजस सिरसे याने गाजवताना अॅथलेटिक्समध्ये रौप्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आणखी भर टाकली आहे.
औरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत औरंगाबादचे खेळाडू दिमाखदार कामगिरी करण्याची मालिका सुरू आहे. या स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये ४ पदकांची लयलूट करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू सिद्धी व रिद्धी हत्तेकर यांच्यानंतर आजचा दिवस तेजस सिरसे याने गाजवताना अॅथलेटिक्समध्ये रौप्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आणखी भर टाकली आहे.
तेजस सिरसे याने आज ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत १४.४८ सेकंदांची वेळ नोंदवताना रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक दिल्लीच्या रितेश चौधरी याने १४.३८ सेकंद वेळ नोंदवत जिंकले, तर कास्यपदक हरियाणाच्या कमल याने पटकावले. तेजसने ४ बाय १00 रिलेतही कास्यपदक पटकावले. विशेष म्हणजे तेजस सिरसे याने नवी दिल्ली येथील १४ ते १९ डिसेंबरदरम्यान झालेल्य राष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले होते. त्याने ११० मी. अडथळ्याची शर्यत १४.३६ सेकंदांत जिंकली होती. पडेगाव येथे सायकलवर विद्यापीठाच्या मैदानावर प्रशिक्षक सुरेंद्र मोदी व नितीन निरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो. विशेषत: राज्यस्तरीय स्पर्धेत कधीही सहभाग न नोंदवताना त्याने सलग दुसºयांदा पदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला. तो देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याआधी औरंगाबादच्या सिद्धी व रिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवत पदकांची उधळण केली होती. सिद्धी हत्तेकर हिने गुरुवारी सुवर्णपदकाची कमाई केली. सिद्धी हत्तेकर हिने ८.५५ गुणांची कमाई करताना अनइव्हन बार या साधन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. तिची जुळी बहीण रिद्धीने बॅलन्सिंग बीम या साधन प्रकारात १०.४५ गुणांसह कास्यपदक जिंकले. या यशाबद्दल तेजस सिरसे याचे विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे, कुलसचिव साधना पांडे, क्रीडा संचालक दयानंद कांबळे, प्रशिक्षक पूनम नवगिरे, देवगिरी महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख शेखर शिरसाठ आदींनी त्याचे अभिनंदन केले.