लुटलेल्या मोबाईलमध्ये सीम कार्ड टाकले आणि पोलीस पोहचले आरोपीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:03 AM2021-02-18T04:03:11+5:302021-02-18T04:03:11+5:30
औरंगाबाद: पालघर येथे कार्यरत, शहरातील रहिवासी अभियंत्याला नोव्हेंबर २०२० मध्ये मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाला गुन्हे ...
औरंगाबाद: पालघर येथे कार्यरत, शहरातील रहिवासी अभियंत्याला नोव्हेंबर २०२० मध्ये मध्यरात्री चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींपैकी एकाला गुन्हे शाखेने बुधवारी दुपारी किराडपुऱ्यात पकडले. आरोपीच्या मुख्य साथीदारासह दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.
सय्यद नासेर सय्यद ताहेर (२२, रा. रहेमानिया कॉलनी, किराडपुरा ) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार राधेश्याम रतनलाल कुमावत ( रा. गादीया विहार) हे २९ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पालघर येथून औरंगाबादला आले. रिक्षाचालकाने त्यांना शासकीय दूध डेअरी चौकात सोडले. तेथून ते गादिया विहारकडे पायी जात होते. पेट्रोल पंपाजवळ दुचाकीस्वार तीन जणांनी त्यांना अडवून पैसे मागितले. त्यांनी नकार देताच आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील ४ हजार रुपये ठेवलेले पैशाचे पाकीट आणि मोबाईल हिसकावून नेला होता. कुमावत यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी आरोपींच्या दुचाकीचा अर्धवट क्रमांक पोलिसांना सांगितला होता. या गुन्ह्याचा पोलीस तपास करीत असतांना आरोपींनी लुटलेला मोबाईल एक महिला वापरत असल्याचे चार महिन्यानंतर गुन्हे शाखेला समजले.
पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, विठ्ठल सुरे, प्रभाकर राऊत, सानप आदींनी तपास करून या मोबाईलचे सीमकार्ड कुणाच्या नावे आहे याची माहिती काढली. तेव्हा सय्यद नासेर याने त्याच्या नातेवाईक महिलेला हा मोबाईल वापरण्यास दिल्याचे समजले. बुधवारी दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने किराडपुरा राम मंदिर येथे त्याला बोलावले. तेव्हा तो गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी घेऊन तेथे आला होता.
म्हणे हजार रुपयांत केला मोबाईल खरेदी
पोलिसांनी त्याच्याकडे चोरीच्या मोबाईलविषयी विचारपूस केली असता त्याने तो मोबाईल मध्यवर्ती बसस्थानक येथे हजार रुपयांत खरेदी केल्याचे खोटे सांगितले. मात्र त्याच्याजवळच्या दुचाकीवरील क्रमांक फिर्यादीने दिलेल्या आकड्याशी जुळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत अन्य दोन साथीदारांची नावे सांगितली. अन्य आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.