पंढरपुरात कामदा एकादशी साधेपणाने साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:02 AM2021-04-24T04:02:01+5:302021-04-24T04:02:01+5:30
वाळूज महानगर : छोट्या पंढरपुरात शुक्रवारी कामदा एकादशी साधेपणाने साजरी करण्यात आली. येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात शुक्रवारी पहाटे सोशल ...
वाळूज महानगर : छोट्या पंढरपुरात शुक्रवारी कामदा एकादशी साधेपणाने साजरी करण्यात आली. येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात शुक्रवारी पहाटे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून अभिषेक, पूजा व आरती घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास पोलीस प्रशासनाकडून प्रतिबंध घालण्यात आल्याने अनेकांनी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
साजापूर चौफुलीवर दिशादर्शक फलक लावा
वाळूज महानगर : साजापूर-करोडी चौफुलीवर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. या चौफुलीवर दिशादर्शक फलक नसल्याने दौलताबाद, भांगसीमाता गडवेरुळ व खुलताबादकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहने उभी करून विचारपूस करावी लागते. या चौफुलीवरून सोलापूर-धुळे व मुंबईन-नागपूर महामार्ग गेलेला असल्याने या चौफुलीवरून दौलताबाद- खुलताबादकडे कसे जावे, असा प्रश्न प्रवासी व वाहनधारकांना पडला आहे. या चौफुलीवर दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
लॉकडाऊनमुळे बांधकाम मजुरांची उपासमार
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात लॉकडाऊनमुळे नवीन बांधकामे बंद करण्यात आल्याने बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. गत आठवडाभरापासून बांधकाम व्यावसायिकांनी लॉकडाऊनचा धसका घेत नवीन बांधकामे बंद केली आहेत. लॉकडाऊनमुळे अचानक रोजगार हिरावला गेल्याने मिस्तरी, बिगारी व मजुरी काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकाम ठेकेदाराकडून अर्थिक मदत केली जात नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे अफसर शेख, सुरेश त्रिभुवन, अल्ताब शेख आदींनी केली आहे.
जोगेश्वरीत वीजपुरवठा सुरळीत करा
वाळूज महानगर : जोगेश्वरीत महावितरणकडून वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने वीजग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे. महावितरणकडून ग्राहकांना कुठलही पूर्वसूचना न देता सतत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
दत्तनगरात ड्रेनेजचे पाणी उघड्यावर
वाळूज महानगर : वाळूजच्या दत्तनगरातील ड्रेनेजलाइन फुटल्याने घाण पाणी उघड्यावर साचत असून, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. दोन दिवसांपासून येथील ड्रेनेजलाइन फुटली असून, ड्रेनेजमिश्रित सांडपाणी मोकळ्या भूखंडावर साचले आहे. ड्रेनेजलाइनच्या दुरुस्तीसाठी सोसायटीतील नागरिक व ग्रामपंचायत प्रशासनही डोळेझाक करीत असल्याचे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे.