नाशिक अपघाताचे पाप राज्यातील 'इडी' सरकारचे; आणखी किती जीव घेणार? नाना पटोले संतप्त
By सुमेध उघडे | Published: October 8, 2022 01:59 PM2022-10-08T13:59:20+5:302022-10-08T14:00:33+5:30
महाविकास आघाडीच्या सरकारचे बजेटमधील सुरु असलेले कामे राज्यातील 'इडी' सरकारने स्थगित केले आहेत.
औरंगाबाद: नाशिक येथे आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोठा अपघात घडला. यात अनेकांनी जीव गमावले. हे राज्य सरकारचं पाप होय. कारण, महाविकास आघाडीच्या काळात सुरु असलेल्या सर्व कामांना राज्य सरकारने स्थगिती दिली. मी माहिती घेतली आहे. हा अपघात खड्डे चुकुवताना झाला. त्यामुळे अनेक अपघातात लोकांना जीव गमवावा लागत आहे, अशी तिखट प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. औरंगाबाद विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी आज सकाळी संवाद साधला.
यवतमाळ येथून मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसचा नाशिक येथे ट्रेलरच्या धडकेने भीषण अपघात झाला. यात बसने पेट घेतल्याने १२ प्रवाश्यांच्या होरपळून मृत्यू झाला. या मनसुन्न करणाऱ्या अपघातावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली असून यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आजे. ते म्हणाले, ' मी माहिती घेतली असून हा अपघात खड्डे चुकविताना झाला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचे बजेटमधील सुरु असलेले कामे राज्यातील 'इडी' सरकारने स्थगित केले आहेत. अनेक रस्त्यांची कामे बंद आहेत. यामुळे रस्ते अपघात वाढलेत. हा अपघात मोठा होता म्हणून निदान माहिती तरी मिळाली. पण रोज अनेक छोटे अपघात होतात. यात अनेकांचे जीव जात आहेत. हे सर्व पाप राज्य सरकारचे आहे. आणखी किती लोकांचा जीव हे सरकार घेणार आहे, असा सवालही पटोले यांनी केला.
रस्ते अपघातात जीव गमवावा लागतो हे राज्य सरकारचं पाप, नाना पटोलेंनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं @NANA_PATOLEpic.twitter.com/B695KbA8HT
— Lokmat (@lokmat) October 8, 2022
जळालेल्या बसमध्ये पंचनामा करताना सापडले आणखी २ मृतदेह
नाशिक - औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात खासगी बस आणि टँकरचा आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला १० मृतदेह आढळले होते. परंतु घटनास्थळी पोलीस जळालेल्या बसचा आतून पंचनामा करत असताना सीटखाली आणखी २ मृतदेह आढळल्याने बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. सापडलेले मृतदेह पूर्णपणे जळाल्याने ओळख पटवून मोठं आव्हान निर्माण झाले आहे.