रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, प्रवाशाची २२ हजार रुपये असलेली बॅग केली परत
By राम शिनगारे | Published: January 11, 2023 07:17 PM2023-01-11T19:17:11+5:302023-01-11T19:17:17+5:30
मुद्देमाल निरीक्षक गिरी यांनी बुधवारी सय्यद मेहराज अहेमद यांच्याकडे सुपूर्द केला.
औरंगाबाद : लातूर येथील व्यक्तीची २२ हजार रुपये राेख व कागदपत्रे असलेली बॅग रिक्षातच विसरली. तेव्हा तक्रारदाराने सिटी चौक पोलिस ठाणे गाठले. त्याठिकाणी वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी अंमलदाराच्या मदतीने सीसीटीव्हीची पाहणी करून रिक्षा शोधली. त्यावरील नंबरवरून मालकाचा शोध घेत २२ हजार रुपयांची बॅग संबंधिताकडे ११ जानेवारी रोजी सुपूर्द केली.
लातूर येथील सय्यद मेहराज अहेमद हे शहरात आले होते. त्यांची बॅग व पर्स एका रिक्षात विसरली. त्यात २२ हजार रुपये रोख, आधारकार्ड, पॅनकार्ड अशी विविध कागदपत्रे होती. त्यामुळे त्यांनी सिटी चौक ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी निरीक्षक गिरी यांनी अंमलदार अभिजित गायकवाड याच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे रिक्षाचा नंबर मिळवला.
रिक्षाचा क्रमांक मिळाल्यानंतर वाहतूक शाखेचे हवालदार अशोक कदम यांच्याकडील मशीनद्वारे रिक्षाचा मालक व त्याचा मोबाइल नंबर मिळवला. त्या मोबाइलवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी मंजूर अहेमद खान (रा.गल्ली नं. २, कटकट गेट) असे नाव सांगितले. पैसे व कागदपत्रे असलेली बॅग ठाण्यात आणून दिली. हा मुद्देमाल निरीक्षक गिरी यांनी बुधवारी सय्यद मेहराज अहेमद यांच्याकडे सुपूर्द केला.