एकच लक्ष्य; कागदावर वृक्ष...

By Admin | Published: July 23, 2016 12:18 AM2016-07-23T00:18:59+5:302016-07-23T01:10:09+5:30

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजले असून, रोपांच्या कमतरतेमुळे हा सगळा प्रकार घडल्याचे उघडकीस आले

Single goal; Tree on paper ... | एकच लक्ष्य; कागदावर वृक्ष...

एकच लक्ष्य; कागदावर वृक्ष...

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यासह औरंगाबादमध्ये १ जुलै रोजी राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण मोहिमेसाठी खोदण्यात आलेले खड्डे बुजले असून, रोपांच्या कमतरतेमुळे हा सगळा प्रकार घडल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. ‘एकच लक्ष्य; दोन कोटी वृक्ष’ ही घोषणा ‘एकच लक्ष्य; कागदावर वृक्ष’अशी झाली आहे.
देवळाई, सातारा टेकड्यांवरील हजारो खड्डे पावसाने पूर्णत: बुजले असून, हर्सूल तलावाच्या सीमेवर २ हजार जांभळांची झाडे लावण्याची संकल्पनादेखील हवेत विरली आहे. तलावालगत जांभळांची झाडेही नाहीत आणि खड्डेदेखील नाहीत. अशा परिस्थिती असताना जिल्ह्यात १ जुलै रोजी झालेल्या वृक्षारोपण लक्ष्यपूर्तीचा दावा किती खरा किती खोटा याचे परीक्षण करण्याची वेळ आली आहे. मराठवाडा विभागात एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ४.६ टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे.
त्यात वाढीसाठी १ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली वृक्षारोपण मोहीम राबविली तरी रोपं नसल्यामुळे ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नसल्याचे दिसते. या वृक्षारोपण मोहिमेत महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, नगरविकास, सहकार व पणन, सांस्कृतिक कार्य व पर्यटन, उच्च व तंत्रशिक्षण, गृह, परिवहन, ऊर्जा, विधि व न्याय, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंधारण, शालेय शिक्षण व क्रीडा, आदिवासी विकास, जलसंपदा, सामाजिक न्याय आणि कृषी, असे राज्य शासनाचे २० विभाग सहभागी झाले होते. या सर्व विभागांनी कुठे वृक्षारोपण केले, याचे परीक्षण कोण करणार, असा प्रश्न आहे. वृक्षारोपणासाठी विभागातील सामाजिक वनीकरण विभागाच्या ३४, वन विभागाच्या ८७ व इतर शासकीय विभागांच्या ७ तसेच २९ खाजगी रोपवाटिकांमधून रोपे उपलब्ध करून देण्यात आली; परंतु रोपांची संख्या कमी पडल्याने खोदलेले खड्डे बुजले आहेत.
रोपं नसल्यामुळे खड्डे बुजले...
वृक्षारोपण मोहिमेसाठी खड्डे केले; परंतु रोपं नसल्यामुळे खड्डे बुजले. रोपं मिळाली नाहीत. कुठेही रोपे शिल्लक नव्हती म्हणून काही ठिकाणी खड्डे तसेच राहिले असतील. या मोहिमेत सहभाग घेणाऱ्या संस्था शासनाच्या होत्या. प्रत्येक संस्थेकडे वृक्षारोपणाची नोंद असेलच. ती नोंद संकलित करावी लागणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाचा मूल्यांकन विभाग आहे. तो या मोहिमेतील जगलेल्या वृक्षांची नोंद घेईल, असे उपवरसंरक्षक अशोक गिऱ्हेपुजे यांनी सांगितले. १ जुलैची उद्दिष्टपूर्ती झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तो कागदावरच असल्याची परिस्थिती सातारा, देवळाई, हर्सूल परिसरातील बुजलेले खड्डे पाहिल्यानंतर निर्माण होत आहे. यावर गिऱ्हेपुजे म्हणाले, ज्या संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला. त्यांनी केलेल्या वृक्षारोपणाचे आॅडिट करण्याच्या सूचना अजून वरिष्ठ पातळीकडून आलेल्या नाहीत. आॅडिट कोण करणार हे ठरलेले नाही. आॅडिट झाल्यावर सर्व काही समोर येईल.
औरंगाबादमधील रोपांची स्थिती..
औरंगाबाद जिल्ह्यात ७ लाख २० हजार वृक्ष लावण्याचे टार्गेट होते; परंतु ३ शासकीय आणि ८ खाजगी रोपवाटिकांमध्ये फक्त १ लाख ८५ हजार ३०० रोपे होती. अशा स्थितीत उर्वरित रोपे कुठून आणली. जुन्याचे नवीन करून लक्ष्यपूर्ती करण्यात आली काय, यासारखे काही प्रश्न पुढे येत आहेत.
अशीच अवस्था मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत असू शकते. जालना जिल्ह्यात ३ लाख ३० हजार, बीड ८ लाख २० हजार, परभणी ३ लाख १० हजार, लातूर ९ लाख १० हजार, उस्मानाबाद ५ लाख ५० हजार, नांदेड ६ लाख ४० हजार, हिंगोली ५ लाख ३० हजार वृक्ष लावण्याचे टार्गेट होते. जांभूळ, वड, पिंपळ या झाडांच्या रोपांची संख्या कमी होती.
या मोहिमेसाठी झालेल्या खर्चाबाबत गिऱ्हेपुजे यांनी सांगितले, प्रत्येक विभागाने आपापल्या पातळीवर खर्च केला असेल. रोपे तर वन विभागाने मोफत उपलब्ध करून दिली होती. कुठे कमी पडली असतील तर त्यासाठी थोडाफार खर्च झाला असेल. हे प्रत्येक विभागाने केलेल्या वृक्षारोपणाच्या आॅडिटनंतरच कळू शकेल. खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे काय, यावर ते म्हणाले, वृक्षारोपण मोहीम यापुढेही निरंतर चालूच राहणार आहे. हर्सूल तलाव सीमेलगत जांभूळवन निर्मितीची संकल्पना होती. त्यासाठी १ जुलै रोजी २ हजार जांभळांची झाडे तलावाच्या सीमेवर लावण्यात येणार होती. तलावाच्या सीमेवर कुठलेही वृक्षारोपण झाले नसल्याचे हे छायाचित्र.

 

Web Title: Single goal; Tree on paper ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.