साहेब, काहीही करा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:02 AM2021-04-19T04:02:11+5:302021-04-19T04:02:11+5:30
औरंगाबाद : कोरोनातील डबल म्यूटंट व्हायरस सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. संसर्ग झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नागरिकांचा मृत्यू होतोय. रुग्णांचा ...
औरंगाबाद : कोरोनातील डबल म्यूटंट व्हायरस सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. संसर्ग झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नागरिकांचा मृत्यू होतोय. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाइकांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड सहजासहजी मिळेनात. कोरोनासाठी महापालिकेने सुरू केलेल्या स्वतंत्र वॉर रूममध्ये २४ तासात किमान ३०० ते ५०० नागरिकांचे कॉल येतात. यातील बहुतांश नागरिकांना आपल्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची गरज असते. बेड उपलब्ध असल्यास संबंधित रुग्णालयांत जाण्याचा सल्ला मनपाकडून देण्यात येतो.
सुधारणा होण्याऐवजी कोरोना परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. वर्षभरापूर्वीच महापालिकेने कोरोनासाठी स्वतंत्र वॉररूम तयार केली आहे. या वॉररूममध्ये हेल्पलाइनची व्यवस्था आहे. एक वर्षापासून कर्मचारी सुट्टी न घेता २४ तास सेवा देत आहे. २४ तासात ३०० ते ५०० नागरिकांना मदत करण्याचे काम हेल्पलाइनकडून होते. औरंगाबाद महापालिकेचा हेल्पलाइन नंबर राज्यातील इतर जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. शंभर ते सव्वाशे कॉल दररोज इतर जिल्ह्यातून येतात. औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिकांचा बेड मिळविण्यासाठी सर्वात जास्त आक्रोश आहे. महापालिकेच्या एमएचएमएच ॲपवर उपलब्ध बेडची माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते. ज्या ठिकाणी बेड उपलब्ध आहेत तेथील माहिती नागरिकांना देण्यात येतो. याशिवाय वॉररूममधून पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्ण, लसीकरण मोहीम, घाटी रुग्णालयाकडून प्राप्त होणारे अहवाल आधी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करण्यात येते. वॉररूम महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी बॅकबोन म्हणून काम करीत आहे.
वॉररूममध्ये ४५ कर्मचारी
मार्च २०२० मध्येच महापालिका मुख्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली. त्यासाठी ४५ कर्मचारी नेमले आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये २४ तास कर्मचारी काम करीत असतात. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकही नेमले आहेत. वॉररूममधील डाटा फीडिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी जबाबदारी दिलेली आहे. अँटिजन, आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या नागरिकांची माहिती तयार करण्यात येते. कोरोनाशी संबंधित सर्वाधिक अपडेट माहिती ठेवण्याचे काम येथील कर्मचारी करतात. वेगवेगळ्या केंद्रांवरून माहिती उपलब्ध न झाल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शहरातील खासगी रुग्णालये महापालिकेला अजिबात माहिती उपलब्ध करून देत नाहीत हे विशेष.
पॉझिटिव्ह आलोय, कुठे उपचार घ्यायला जाऊ
मागील वर्षी लाळेचे नमुने दिल्यानंतर संशयित रुग्णाला महापालिकेच्या स्वतंत्र विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत होते. आता रुग्ण लाळेचे नमुने देऊन घरी जातो. पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच तो महापालिकेच्या हेल्पलाइनशी संपर्क साधतो. डॉ. बासित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पुढील मार्गदर्शन २४ तास करतात. महापालिकेच्या यंत्रणेलाही पॉझिटिव्ह रुग्ण कुठे उपचारासाठी ठेवावेत याबाबत ते मार्गदर्शन करतात.
कोरोनाशी संबंधित प्रत्येक माहिती अद्ययावत व्हावी, राज्यशासनाला रिपोर्टिंग चांगली गेली पाहिजे, या दृष्टीने वॉररूममधील कर्मचाऱ्यांचा कसोशीने प्रयत्न सुरू असतो. दिवसभरातून तीन ते चार वेळेस वेगवेगळ्या माहितीचे रकाने अपडेट करावे लागतात. माहिती संकलित करावी लागते.
डॉ. मेघा जोगदंड, वॉररूम प्रमुख.
व्यवस्था चांगली
महापालिका प्रशासनाकडून वॉररूममधील कर्मचाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. चहा, नाश्ता उपलब्ध करून देण्यात येतो. काम खूप आहे. अनेकदा काही जण आजारी पडतात. त्यामुळे कामाचा लोड प्रचंड वाढतो. आणखी कर्मचारी वाढवल्यास कामाचा थोडा लोड कमी होऊ शकतो, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.