साहेब, आमदार रोडवर जायचे कसे? सातारावासीयांना पडला प्रश्न; वाहनधारकांचा जीव मुठीत
By साहेबराव हिवराळे | Published: February 29, 2024 07:06 PM2024-02-29T19:06:40+5:302024-02-29T19:06:53+5:30
संग्रामनगर पुलावरून उतरल्यावर बायपासला जावे लागते ‘विरुद्ध दिशेला’
छत्रपती संभाजीनगर : बीड बायपासचा कायापालट करून नुकतेच तीन फ्लायओव्हर उभारण्यात आले. मात्र, या बायपासला सर्व्हिस रोडचे काम सुरू करून नागरिकांना पुन्हा वेठीस धरणे सुरू झाले आहे. पादचारी, वाहनधारक सर्वांनाच जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून जावे लागत आहे. सर्व्हिस रोडचे काम सुरू झाल्याने नाइलाजाने संग्रामनगर पुलावरून बायपासच्या खालून विरुद्ध दिशेने तर कायमच अपघातास आमंत्रण दिले जात आहे. इथे या रस्त्यावरील प्रवास नेमका जीवघेणा ठरत आहे.
नेमके काय होत आहे ?
- सातारा आमदार रोडवरून घरी जाताना त्यांंना या रस्त्याचा अंदाजच येत नसल्याने या रस्त्यावरील प्रवास गुंतागुंतीचा ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिस, महानगरपालिका प्रशासनाने एकत्र लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
- पुलावरून येताना सातारा यू टर्न घेऊन जाणे सोपे; परंतु संग्रामनगरकडून दवाखान्यासमोरून चार रस्ते ओलांडून यू टर्न करून गाडी चालवणे धोक्याचे ठरते आहे. कारण इथे सिग्नल नाही. वाहतूक पोलिसही नसतो आणि असल्यास तो काहीही सांगत नाही. यामुळे वारंवार अपघात होत आहेत.
किती दिवस लागणार ?
रस्त्याच्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काम सुरू असून, एमआयटीकडून येणाऱ्या रस्त्यावर पुलाखालूनच जीव मुठीत धरून सातारा गावात प्रवास करावा लागणार का?
- गणेश पवार (नागरिक)
महिला, मुलांसाठी अधिक धोका
शहरातून येणाऱ्या महिला व लहान मुलांंना ये-जा करावी लागते. विरुद्ध दिशेने वाहने पळविणे त्रासदायक ठरते आहे.
- विजय कुडे (नागरिक)
अपघात नको म्हणून पूल...
अपघाताच्या घटना टाळाव्यात म्हणून रस्ता मोठा झाला. पूल टाकला; परंतु रस्ता बनविताना सामान्य नागरिकांना का विचारात घेतले नाही. साताऱ्यात जावे कसे ?
- प्रवीण पवार (नागरिक)
येथे अनेकदा भांडणे होतात...
पुलावर जाणे तर दूरच राहिले. वाहतूक पोलिसांसमोरच सर्व वाहनधारक या गुंतागुतींच्या रस्त्यावरून आडवे जातात. गावात जाताना अडचणीला तोंड दिले जाते.
- शैलेश सांगोळे (नागरिक)
सिग्नल हवे
सिग्नल लावण्याची जबाबदारी कोणाची हे पाहायला हवे. वाहतुकीला नियम लावण्याचे काम पोलिसांचे तर सिग्नल लावण्याची जबाबदारी मनपाची असून त्याकडे लक्ष प्रशासनाने द्यावे, अन्यथा यू टर्न मार्ग पुलावरून घ्यावा.
- सुनील कोळसे, शाखा अभियंता.