साहेब, मला सोडून माझा पती परस्त्रीसोबत राहतो !
By | Published: November 29, 2020 04:04 AM2020-11-29T04:04:22+5:302020-11-29T04:04:22+5:30
औरंगाबाद : साहेब, माझा पती मला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत राहतो, मला वागवित नाही. ८ महिन्यांपासून घरभाडे थकले, त्याच्यावर कारवाई ...
औरंगाबाद : साहेब, माझा पती मला सोडून दुसऱ्या स्त्रीसोबत राहतो, मला वागवित नाही. ८ महिन्यांपासून घरभाडे थकले, त्याच्यावर कारवाई करा, अशी तक्रार घेऊन आलेल्या महिलेला पुंडलिकनगर पोलिसांनी न्याय दिला. तिच्या पतीसह सासूला बोलावून घेतले आणि कायद्याची भाषा सांगितली. तेव्हा त्याने तिचे घरभाडे दिले आणि एकत्र राहण्याची तयारी दर्शविली.
पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या उपस्थितीत पुंडलिकनगर ठाण्यात पहिला तक्रार निवारण दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी १८ तक्रारदार उपस्थित होते. यापैकी गजानननगर येथे किरायाने राहणाऱ्या तरुणीचे गतवर्षी लग्न झाले. लॉकडाऊनपासून ती गजानननगर येथे किरायाने खोली करून राहते. मात्र, तिचा पती तिच्याकडे लक्ष देत नाही, तिचा सांभाळ न करता तो बजाजनगर येथे परस्त्रीसोबत राहतो. आठ महिन्यांपासून त्याने पैसे न दिल्याने घरभाडे थकले. कारवाई करा असा अर्ज तिचा होता. पोलिसांनी तिच्या पती आणि सासूला बोलावून घेऊन त्याला कायद्याची भाषा समजून सांगितली. कायद्याने पत्नीचा सांभाळ करण्याची सर्वस्वी जबाबदारी पतीची असल्याचे त्याला पटताच त्याने तिचा सांभाळ करण्याची तयारी दर्शविली. पोलिसांनी तिच्या घरमालकाला बोलावून घेतले तेव्हा घरमालकाने चार महिन्यांचा किराया तिला माफ केला. उर्वरित किरायाची रक्कम लगेच तिच्या पतीने अदा केली आणि तिला सोबत नेत असल्याचे पोलिसांना लिहून दिल्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.
सपोनि सोनवणे म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात १८ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यातील तीन तक्रारी शेजाऱ्यांच्या आपसांतील भांडणाच्या होत्या तर तीन तक्रारी मालमत्ताविषयी दिवाणी स्वरुपाच्या आणि ७ कौटुंबिक वादाच्या होत्या.
=======
दुसरे लग्न करणाऱ्या हवालदारावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ग्रामीण पोलीस दलात कार्यरत पोलीस हवालदार पतीने १९ वर्षांच्या तरुणीसोबत दुसरा विवाह केला. त्याच्यावर कारवाई करण्यासाठी त्याची पत्नी असलेल्या महिला पोलिसांनी तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त गिऱ्हे यांनी यावेळी दिले.
======
क्रांतीचौक ठाण्यात उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या उपस्थितीत २२ तक्रारींवर निर्णय झाल्याचे पोलीस निरीक्षक जी. डी. दराडे यांनी सांगितले.