जिल्ह्यातील रस्त्यांवर वाजतोय ३३८ रुग्णवाहिकांचा ‘सायरन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:04 AM2021-04-17T04:04:56+5:302021-04-17T04:04:56+5:30
औरंगाबाद : शहरातील असो की, जिल्ह्यातील रस्ते, अवघ्या काही मिनिटांत एकामागून एक सायरन वाजवित जाणाऱ्या रुग्णवाहिका पाहायला मिळत आहेत. ...
औरंगाबाद : शहरातील असो की, जिल्ह्यातील रस्ते, अवघ्या काही मिनिटांत एकामागून एक सायरन वाजवित जाणाऱ्या रुग्णवाहिका पाहायला मिळत आहेत. कोरोनामुळे रुग्णवाहिकांची गरज आणखीच वाढली आहे. रुग्णांचा जीव वाचविण्याबरोबर चार पैसे मिळण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात १६ नव्या रुग्णवाहिका रस्त्यावर आल्या. आजघडीला जिल्ह्यातील रस्त्यांवर ३३८ रुग्णवाहिकांचा ‘सायरन’ वाजत आहे.
अपघात असो की अन्य काही आपत्कालीन परिस्थिती, अशावेळी गरजू रुग्णाला कमीतकमी वेळेत रुग्णालयात पोहोचविणे गरजेचे असते. अशावेळी रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका निभावतात. गोल्डन अवरमध्ये प्रत्येकाला उपचार मिळावेत, यासाठी प्रत्येक रुग्णवाहिकाचालक प्रयत्न करीत असतो. गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. अशावेळी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना मदत करता येते. गरजूंना मोफत सुविधा देता येते. त्याबरोबर काही पैसेही हातात पडतात, या भावनेने वर्षभरात १६ रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल झाल्या. गतवर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रस्त्यावर अवघ्या काही मिनिटांनी रुग्णवाहिकांचा आवाज ऐकायला मिळत होता. त्यानंतर हा आवाज कमी झाला होता. परंतु गेल्या काही दिवसांत रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज पुन्हा एकदा सतत ऐकायला मिळत आहे. औरंगाबाद आरटीओ कार्यालयात गेल्या वर्षभरात १६ नव्या रुग्णवाहिकांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णवाहिकांची संख्या ३३८ आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी दिली.
७ वर्षांनंतर सुधारित भाडेदर निश्चित
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात रुग्णवाहिकेचे भाडेदर ७ वर्षांपूर्वी निश्चित केलेले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी ९ जुलै रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित केले. मनपा हद्दीत २५ किमी अथवा २ तासांसाठी वाहनाच्या प्रकारानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. तर मनपा क्षेत्राच्या बाहेर प्रतिकिमी दर ठरविण्यात आले आहेत.