मंदिराजवळ खेळत असलेल्या बहिण भावाचा कुंडात पडून दुखद अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 06:57 PM2017-10-24T18:57:10+5:302017-10-24T18:58:59+5:30
हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या मंदिर परिसरातील कुंडात पडून बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
औरंगाबाद : हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या मंदिर परिसरातील कुंडात पडून बहिण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अनिरुद्ध संदीप पल्लाळ (७) व अनुजा संदीप पल्लाळ (९) अशी मयत मुलांची नावे आहेत. ही घटना सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हर्सूल येथील हरसिद्धी देवीच्या मंदिर परिसरात संदीप पल्लाळ राहतात. ते ट्रकचालक आहेत तर त्यांच्या पत्नी घरकाम करतात. आज दुपारी पल्लाळ हे कामावर गेले तर त्यांची पत्नी घरी होती. यावेळी त्यांची मुले अनिरुद्ध व अनुजा हे घरा जवळील हरसिद्धी देवीच्या मंदिर परिसरात खेळत होती. खेळता खेळता अचानक ते दोघेही मंदिराच्या कुंडात पडली. हि माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी मुलांना वाचविण्यासाठी तात्काळ कुंडाकडे धाव घेतली. सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु; कुंडात पाणी पातळी जास्त असल्याने ती बालके मदतकार्य करणा-यांना ती लागलीच सापडली नाहीत.
काही वेळानंतर नागरिक, पोलीस व सिडको अग्निशामक विभागाच्या पथकाने त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना बेशुद्धावस्थेत घाटीत उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले.