भावजयीस मारहाण प्रकरण: शिवसेना आ. बोरनारेंवरील कारवाईचा अहवाल महिला आयोगाने मागविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 12:15 PM2022-02-21T12:15:50+5:302022-02-21T12:19:27+5:30

भावजयीस मारहाण प्रकरण : राज्य महिला आयोगाचे ग्रामीण पोलिसांना आदेश

sister-in-law assault case: The Women's Commission called for a report on the action taken against Shiv Sena MLA Ramesh Bornare | भावजयीस मारहाण प्रकरण: शिवसेना आ. बोरनारेंवरील कारवाईचा अहवाल महिला आयोगाने मागविला

भावजयीस मारहाण प्रकरण: शिवसेना आ. बोरनारेंवरील कारवाईचा अहवाल महिला आयोगाने मागविला

googlenewsNext

औरंगाबाद : वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या भावजय आणि चुलत भावाला मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधीकडून असे कृत्य होणे हे अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आ. बोरनारेंवर योग्य ती कारवाई करून त्याचा अहवाल तीन दिवसांत राज्य महिला आयोगास सादर करावा, असे आदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी शनिवारी दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार केल्याचा राग मनात धरून शिवसेना आ. रमेश बोरनारे यांच्यासह १० जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला शुक्रवारी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात आ. बोरनारेंसह १० जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भावजयीला मारहाण केल्याचे छायाचित्र सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले. या व्हायरल छायाचित्रांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी तत्काळ दखल घेत घटनेचा निषेध नोंदवला. तसेच तीन दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल आयोगाला सादर करण्याचे आदेश ग्रामीण पोलिसांना दिले. आ. बोरनारेंसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे खासगी सचिव रामदास वाघ यांनी मारहाण झालेल्या जयश्री दिलीप बोरनारे (रा. सटाणा) यांच्याविरोधात जातिवाचक शब्द वापरल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून वैजापूर पोलिसांनी जयश्री बोरनारे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

...तर बोरनारेंना रस्त्यावर फिरू देणार नाही
शिवसेना आ. बोरनारे यांचे वर्तन अशोभनीय आहे. त्यांनी तत्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा भाजपच्या राज्य महिला आघाडीच्या रेखा कुलकर्णी, सविता कुलकर्णी, जि.प. सदस्या पुष्पा काळे, माधुरी अदवंत यांनी वैजापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. तसेच तक्रारदार महिलेच्या विरोधात दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करण्याची मागणीही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी एकनाथ जाधव, कल्याण दांगोडे, डॉ. राजीव डोंगरे, कैलास पवार, मोहन आहेर आदींची उपस्थिती होती.

ग्रामीण पोलिसांवर राजकीय दबाव का?
सत्ताधारी असलेल्या शिवसेना आ. बाेरनारे यांच्यासह सहकाऱ्यांनी भावजयीला बेदम मारहाण केली. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी किरकोळ कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. सदरील महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य आरोपींनी केल्याचा दावा संबंधितांनी केला आहे. तरीही पोलिसांनी विनयभंगासह १० जण असल्यामुळे दरोड्याचेही कलम लावले नाही. आठ तासांच्या ठिय्या नंतर शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल होताच त्यांच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीवरून मारहाण झालेल्या महिलेच्याच विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्याची तत्परता मात्र ग्रामीण पोलिसांनी दाखवली. आ. बोरनारे यांच्यासह गुन्हा नोंदविलेल्या आरोपींना वैजापूर पोलिसांनी दोन दिवस झाले तरी नोटीसही दिलेली नाही. याविषयी वैजापूरचे निरीक्षक समरसिंग राजपूत यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

पीडितेवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा
शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचे शिवसेना आ. रमेश बाेरनारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. गुन्हा दाखल, पण कारवाई शून्य. उलट पीडितेवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का? अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात मुख्यमंत्री? महाराज असते तर कडेलोट केला असता हो या सरकारचा. हे सरकार गोरगरीब धार्जिणे नाही, तर सरकारचे कलाकारी मंत्री, आमदार, खासदार व त्यांचे बगलबच्चे यांचे धार्जिणे आहे.
- चित्रा वाघ, उपाध्यक्ष, राज्य भाजपा

Web Title: sister-in-law assault case: The Women's Commission called for a report on the action taken against Shiv Sena MLA Ramesh Bornare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.