राखी बांधण्याची वेळ व भाऊ रुग्णालयात; भावाच्या आरोग्य रक्षणासाठी बहिणीची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 01:25 PM2019-08-16T13:25:22+5:302019-08-16T13:25:51+5:30
आर्थिक संकटाला तोंड देत औषधोपचाराची काळजी
औरंगाबाद : रक्षाबंधन...भाऊ-बहिणींच्या पवित्र नात्याचे धागे अधिक घट्ट करण्याचा दिवस. राखी बांधल्यानंतर बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर येते. मात्र, ऐन राखीपौर्णिमेच्या तोंडावर आजारपणाने रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आलेल्या भावाच्या आरोग्य रक्षणासाठी एक बहीण धडपडते आहे.
शारदा अरुण सानप (रा. जिंतूर, ह. मु. मुकुंदवाडी) असे या बहिणीचे नाव आहे. त्यांचे भाऊ प्रभू घुगे यांच्यावर एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मूत्रपिंड विभागात उपचार सुरू आहेत. प्रभू घुगे हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मूत्रपिंड विकार असल्याचे निदान झाले. डायलिसिस करण्याची वेळ ओढावली. त्यांना दोन लहान मुले आहेत. या सगळ्या परिस्थितीत प्रभू घुगे यांच्या उपचारासाठी शारदा सानप आणि त्यांचे पती अरुण सानप धावून आले. सानप मिस्त्री काम करतात. हलाखीच्या परिस्थितीमुळे विविध तपासण्या आणि उपचारासाठी आर्थिक परिस्थिती क्षणोक्षणी आड येत आहे.
शासनाच्या जीवनदायी योजनेत उपचार शक्य आहे. परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने ही अडचण येत आहे. या कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. परंतु त्यात अनेक अडथळे येत आहेत. या सगळ्यांना सामोरे जात भावावर पूर्ण उपचार होण्यासाठी शारदा सानप प्रयत्न करीत आहेत. यासाठी कुटुंबियांची साथ मिळते आहे. त्याबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी सहकार्य, प्रयत्न केले जात आहेत. प्रभू घुगे हे मूत्रपिंडाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.
एक भाऊ रुग्णालयात, दोघे गावाकडे
मला तीन भाऊ आहेत. एक भाऊ रुग्णालयात आहे, तर दोघे गावाकडे आहेत. यावर्षी रक्षाबंधनाला भाऊ रुग्णालयात राहील, त्याला यातना भोगाव्या लागतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. उपचारासाठी किती खर्च येईल, हे माहीत नाही. परंतु भावाच्या उपचारासाठी पूर्ण प्रयत्न करीन, असे शारदा सानप म्हणाल्या.