भावाच्या उपचारासाठी बहिणीची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:14 AM2017-10-22T01:14:13+5:302017-10-22T01:14:13+5:30
घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या भावाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी एक बहीण गेल्या अनेक दिवसांपासून धडपड करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया’ याप्रमाणे बहीण-भावातील नाते प्रेम, माया आणि जिव्हाळ्याने भरलेले असते. भाऊबीजेला भावाला ओवाळून औक्षण करून त्याला सुखी आणि आयुष्यमान कर अशी ईश्वराकडे मागणी बहीण करते. अगदी याचप्रमाणे घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या भावाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी एक बहीण गेल्या अनेक दिवसांपासून धडपड करीत आहे.
घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये तसवीर गोंडे (२६, रा. भांबाडा, करमाड) यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची बहीण संगीता गोंडे या भावाच्या उपचारासाठी काळजी घेत आहेत. संगीता गोंडे म्हणाल्या, आई-वडील, तीन भाऊ आणि तीन बहीण अशा कुटुंबातील आमच्या दोघांची उंची जन्मापासून इतरांपेक्षा कमी आहे.
वडील भविष्य पाहून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती हलाखीची. बारावी पास असलेला भाऊदेखील भविष्य पाहण्याचे काम करतो. अशातच काही महिन्यांपूर्वी बकरीच्या गळ्यातील दोरीत पाय अडकून तसवीर गोंडे हे पडले. यामध्ये झालेल्या फ्रॅक्चरमुळे अनेक दिवस खाटेवर पडून राहावे लागले.
एकाच जागेवर पडून राहिल्याने त्यांच्या पाठीला, हाताला जखमा झाल्या. त्यात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने नऊ दिवसांपूर्वीच घाटीत दाखल केले, तेव्हा त्यांचे फुफ्फुस बारीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयाची तपासणी केली जात आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ येत असल्याचे संगीता गोंडे यांनी सांगितले. या परिस्थितीची माहिती मिळाल्याने के. के. ग्रुपचे अध्यक्ष अकील अहमद, किशोर वाघमारे, जुनेद शेख, महंमद आसेफ, जमीर पटेल यांनी मदतीसाठी धाव घेतली.
पाठीतील जखमांमुळे एअर बेड आवश्यक होते. एअर बेडसह औषधी, इंजेक्शन देऊन या लोकांनी मदतीचा हात दिला आहे. भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सुनीता या क्षणभरही त्यांना एकटे सोडत नाहीत. बहिणीसाठी भाऊ धावून गेल्याच्या बºयाच घटना घडल्या आहेत; मात्र घाटीतील या घटनेने भाऊ-बहिणीतील अतूट नात्याचा प्रत्यय घेणाºया प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.