रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:03 AM2021-09-11T04:03:26+5:302021-09-11T04:03:26+5:30
आडूळ : रस्त्यामध्ये कुठे मोठमोठे दगड, कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी यामुळे मृतदेहाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुढे ब्राह्मणगाव ...
आडूळ : रस्त्यामध्ये कुठे मोठमोठे दगड, कुठे गुडघाभर तर कुठे कंबरेपर्यंत पाणी यामुळे मृतदेहाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुढे ब्राह्मणगाव तांड्यावर जाऊच शकत नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी रस्त्यातच थांबून ठिय्या दिला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घटनास्थळी धाव घेऊन आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन कशीबशी रुग्णवाहिका तांड्यावर पोहोचती केली.
ब्राह्मणगाव तांडा येथील रहिवासी एकनाथ रूपा जाधव (४६) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी गावी आणले जात होते. रुग्णवाहिका ब्राह्मणगावात आल्यानंतर पुढे तांड्यावर कशी न्यायची, असा प्रश्न निर्माण झाला. रस्त्यावरून कुठे गुडघ्याएवढे तर कुठे कमरेपर्यंत पावसाचे पाणी वाहत होते. शिवाय रस्त्यात जागोजागी मोठाले दगड पडलेले असल्याने रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ताच नव्हता, त्यामुळे संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येथून मृतदेह हलविणार नसल्याचा पवित्रा घेऊन तेथेच ठिय्या दिला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना याबाबत माहिती पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली व तीन दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. यानंतर ग्रामस्थांनी परिश्रम घेत दगड, माती बाजूला करून रुग्णवाहिकेला तात्पुरती वाट तयार करून दिली.
चौकट
आश्वासन पाळले नाही तर गुरुवारी आंदोलन
ब्राह्मणगाव ते ब्राह्मणगाव तांडा या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. विशेष म्हणजे आडूळ ते ब्राह्मणगाव तांडा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तीन वर्षांपासून एका गुत्तेदाराला दिलेले आहे. ते अद्यापही पूर्ण झाले नाही. थोडा जरी पाऊस झाला तरी ब्राह्मणगाव तांड्याचा इतर गावांशी संपर्क तुटतो. रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला नाही, तर गुरुवारी (दि. १६) सकाळी औरंगाबाद- बीड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोर बंजारा ब्रिगेड व संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.
फोटो :
100921\img-20210910-wa0070.jpg
रुग्णवाहिकेला तांड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने,ग्रामस्थांनी परिश्रम घेत रुग्णवाहिकेला जाण्यासाठी जागा करुन दिली.