कशीशच्या खून खटल्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 04:01 PM2022-05-26T16:01:19+5:302022-05-26T16:01:36+5:30

Kashish murder case: पोलीस आयुक्तांच्या आदेशाने तपास गुन्हे शाखेकडे वर्ग; चमूत २ निरीक्षक, २ उपनिरीक्षक

SIT set up to probe Kashish's murder case in Aurangabad | कशीशच्या खून खटल्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

कशीशच्या खून खटल्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन

googlenewsNext

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थिनी सुखप्रीत कौर ऊर्फ कशीशच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. वेदांतनगर पोलिसांकडून हा तपास काढून घेत गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. या पथकात दोन वरिष्ठ निरीक्षकांसह दोन उपनिरीक्षकांची नियुक्ती केली. याविषयीचे आदेश पोलीस उपायुक्त अपर्णा गिते यांनी काढले आहेत.

रचनाकार कॉलनीत शरणसिंग सेठी याने २०० फूट ओढत नेऊन कशीशचा २१ मे रोजी दुपारी निर्घृण खून केला. पोलिसांनी आरोपीला २४ तासांत बेड्या ठोकल्या. मात्र खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे पोलिसांचा तपासही तेवढ्याच वेगवान पद्धतीने होऊन सज्जड पुरावे जोडावे लागणार आहेत. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त डाॅ. गुप्ता यांनी तपासासाठी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली. यात सायबर ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर, वेदांतनगरचे उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, हवालदार सुनील बडगुजर आणि वीरेश बने यांचा समावेश आहे. मुख्य तपासी अधिकारी म्हणून निरीक्षक आघाव काम करतील.

...अन् तपासी अधिकारी बदलले
घटना घडल्याच्या दिवशी गुन्हे शाखेचे निरीक्षक आघाव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेदांतनगर पोलीस ठाण्यात धाव घेत मूळ फिर्याद अधिक मजबूत करण्यासाठी टायपिस्टकडे बसून चुका दुरुस्त करण्यास सुरुवात केली. मात्र शेजारच्या केबिनमध्ये बसलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा आपल्या अधिकारात हस्तक्षेप असल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी आघाव यांना स्वत:च्या केबिनमध्ये पोलिसांकरवी बोलावून घेतले. आघाव यांनी चुका दुरुस्त करीत असल्याचा निरोप दिल्यानंतरही बोलावणे थांबले नाही. त्यामुळे आघाव यांनी तेथून काढता पाय घेतला. आता आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासी अधिकारी बदलून आघाव यांच्याकडे तपास सोपवला आहे.

Web Title: SIT set up to probe Kashish's murder case in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.