बाजारसावंगी परिसरात सहा जनावरांचा अज्ञात आजाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:06 AM2021-03-26T04:06:12+5:302021-03-26T04:06:12+5:30
बाजारसावंगी : सावखेडा व बाजारसावंगी येथे मागील आठवडाभरापासून अज्ञात आजाराने शेतकऱ्यांची झोप उडविली असून प्रथम चार व नंतर दोन ...
बाजारसावंगी : सावखेडा व बाजारसावंगी येथे मागील आठवडाभरापासून अज्ञात आजाराने शेतकऱ्यांची झोप उडविली असून प्रथम चार व नंतर दोन अशा सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे.
सावखेडा येथे आठवड्यापासून अज्ञात आजाराने जनावरे दगावत असून, प्रशासनासह शेतकरी चिंतेत पडले आहेत. आजारी जनावरांची तपासणी व उपचार होण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांच्या आदेशाने एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. शिल्पा चौधरी (पशुधन विकास अधिकारी, खुलताबाद), आय. जे. गहिरे (सहायक विकास अधिकारी, खुलताबाद), डॉ. साळवे (पशुधन विकास अधिकारी पैठण), डॉ. विकास बनकर (पशुधन पर्यवेक्षक) डॉ. विजय इटावले, डॉ. नीलम पाडवी, डॉ. निखिल शिंदे, डॉ. नीळकंठवार, डॉ. महेश शितलंबे, डॉ. सुबोध जाधव, डॉ. पी. पी. काथार, डॉ. अक्षय काळे यांनी तपासणी व उपचार केले. डॉक्टरांच्या पथकाला जनावरांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळली असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच जनावरांमध्ये पांढऱ्या पेशींची जास्त वाढ झाल्याचे डॉ. शिल्पा चौधरी यांनी सांगितले. यावेळी इरफान आहेमद शेख, दिनेश वसंत जाधव, शहा अरफात वजीर व इतर शेतकरी उपस्थित होते. या पथकाने गुरुवारी चाळीसपेक्षा जास्त जनावरांची तपासणी केली.
चौकट
पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी
बाजारसावंगी परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी अडचणी येत आहेत. नाईलाजाने खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहे. येथील रिक्त पदे भरावीत नसता, आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बाजारसावंगी, बोडखा, सावखेडा, लोणी, धामणगाव येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
फोटो : सावखेडा येथे जनावरांची तपासणी करताना पशुवैद्यकीय अधिकारी.