महावितरणची दिरंगाई मुक्या जनावरांच्या जीवावर बेतली; विद्युतवाहिनी डोहात पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:53 PM2021-01-02T18:53:16+5:302021-01-02T18:57:48+5:30

Six buffaloes die due to electric shock in Paithan : ओढ्यावरून जाणारी विद्युतवाहिनी अचानक तुटून पाण्यात पडली. विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने पाण्यातील सहाही म्हशी तडफडून मरण पावल्या.

Six buffaloes die due to electric shock in Paithan; The herdsman broke Humberda | महावितरणची दिरंगाई मुक्या जनावरांच्या जीवावर बेतली; विद्युतवाहिनी डोहात पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू

महावितरणची दिरंगाई मुक्या जनावरांच्या जीवावर बेतली; विद्युतवाहिनी डोहात पडल्याने सहा म्हशींचा तडफडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच वेळी सहा म्हशी मरण पावल्याने पशुपालकाच्या परिवाराने फोडला हंबरडाफोन आल्यामुळे मुलाचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

पैठण : शहरालगत पाचोड रोडवरील ओढ्याच्या डोहात शनिवारी दुपारी पाणी पिण्यासाठी उतरलेल्या म्हशीवर विद्युतवाहिनी तुटून पडल्याने सहा म्हशी मरण पावल्या. सुदैवाने या घटनेत एक गाय वाचली. मात्र, विद्युत शॉक बसल्याने गाय अर्धमेल्या अवस्थेत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी या गायीवर उपचार करत आहेत. सदर सहा म्हशी एकाच मालकाच्या असल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. 

पैठण शहरातील शंकर सदाशीव काटकर ( रा. इंदिरानगर ) यांच्या मालकिच्या पाच म्हशी, एक रेडा व एक गाय आज नेहमीप्रमाणे पाचोड रोडवरील वनवे जिनिंग पाठिमागील  परिसरात चरण्यासाठी सोडल्या होत्या. दरम्यान,  गाय वगळता सर्व जनावरे परिसरातील ओढ्यात उतरली. दुर्देवाने ओढ्यावरून जाणारी विद्युतवाहिनी अचानक तुटून पाण्यात पडली. विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने पाण्यातील सहाही म्हशी तडफडून मरण पावल्या. ओढ्याच्या किनाऱ्यावर असलेल्या गायीला सुद्धा विद्युत धक्का बसला असून ती अर्धमेल्या अवस्थेत आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के, नगरसेवक ईश्वर दगडे व इंदिरानगर भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्युत पुरवठा बंद करून ट्रक्टरच्या सहाय्याने म्हशीचे शव पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निवास भुजंग यांनी म्हशीचे शवविच्छेदन केले. एकाच वेळी सहा म्हशी मरण पावल्याने काटकर यांच्या परिवाराने फोडलेला हंबरडा उपस्थितांना हेलावून गेला. महावितरणने  संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप सोनटक्के यांनी केली आहे.

फोन आला आणि मुलगा वाचला
शंकर काटकर यांचा मुलगा म्हशी पाठिमागे होता. म्हशी पाण्याबाहेर काढण्यासाठी तो डोहात जात असतानाच त्याला मोबाईलवर कॉल आला. यामुळे तो दूरवरच बोलत थांबला. याच वेळेस पाण्यात विद्युतवाहिनी तुटून पडली. फोन आल्यामुळे मुलाचे प्राण वाचले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

दीड महिन्यात दुसरी घटना 
याच परिसरातील काही अंतरावर असलेल्या डोहात २१ नोहेंबर २०२० रोजी पैठण शहरातील अनवर पाटणी यांच्या चार म्हशी अशाच प्रकारे विद्युतवाहिनी पाण्यात पडल्याने मरण पावल्या होत्या.  दिड महिन्याच्या आत दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला. पोलवरील विद्युत तारेची तपासणी नियमित न केल्याने महावितरणची दिरंगाई मुक्या जनावरांच्या जीवावर बेतत आहे. तसेच अशा घटनेने पशुपालाकांचे मोठे नुकसान होत असल्याने महावितरणने तत्काळ सर्व विद्युतवाहिन्यांची तपासणी करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

सात तारखेला मुलीचे लग्न, म्हशीवरच होता उदरनिर्वाह 
इंदिरानगर येथील शंकर काटकर यांचा उदरनिर्वाह म्हशीवर अवलंबून होता. म्हशीचे दूध काढून विक्री करणे हाच काटकर यांचा व्यवसाय. परंतू, अचानक सहा म्हशी मरण पावल्याने काटकर यांच्यावर आभाळ कोसळे आहे. उदरनिर्वाहाचे साधनच नियतीने हिरावून घेतल्याने काटकर परिवार हादरून गेला आहे. जवळपास सहा लाख रूपयाचा म्हशी मरण पावल्या असून उदरनिर्वाहाचे साधनही हातातून गेले आहे. यातच काटकर यांच्या मुलीचा विवाह दि. ७ जानेवारी रोजी होणार आहे. सहा पैकी दोन म्हैस विकून विवाहाचा खर्च करण्याचे त्यांनी ठरवले होते. दुर्दैवाने सहाही म्हशी मरण पावल्याने काटकर यांच्यावर संकट कोसळले आहे. आता विवाहाचा खर्च कसा करावा असा प्रश्न काटकर कुटुंबासमोर उभा राहिला आहे. 

Web Title: Six buffaloes die due to electric shock in Paithan; The herdsman broke Humberda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.