आयकरच्या नवीन ई- फाईलिंग पोर्टलवर सहा सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:04 AM2021-05-29T04:04:11+5:302021-05-29T04:04:11+5:30
औरंगाबाद : आयकर भरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी. आयकरचे नवीन ई- फाईलिंग पोर्टल ७ जूनपासून सुरू होणार आहे. जलदगतीने सेवा देणाऱ्या ...
औरंगाबाद : आयकर भरणाऱ्यासाठी आनंदाची बातमी. आयकरचे नवीन ई- फाईलिंग पोर्टल ७ जूनपासून सुरू होणार आहे. जलदगतीने सेवा देणाऱ्या या पोर्टलमुळे आयकरदात्यांना सहा सुविधा मिळणार आहे.
आयकरदात्यांची संख्या वाढत आहे, तसेच आयकर विभागही तंत्रज्ञानात ‘अपग्रेड’ होत आहे. येत्या ७ जूनपासून नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू होत आहे. नवीन पोर्टलवर आयकर विवरणपत्र जलद गतीने तपासून करदात्यांना लवकरात लवकर परतावा दिला जाईल. करदात्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता कॉल सेंटर तयार करण्यात येणार आहे. पोर्टलवरील सर्व महत्त्वाची कामे लिंक एकच डॅशबोर्डवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे आयकर भरणा अधिक सुलभ केला जाणार आहे. यात जसे क्रेडिट कार्ड, यूपीआय, आरटीजीएस, एनईएफटीद्वारे कर भरणा केला जाईल, असा दावा आयकर विभागाने केला आहे. पोर्टलचा वेग वाढल्याने आयकर ई विवरणपत्र भरण्यास गती मिळेल, असेही आचलिया यांनी नमूद केले.
१ ते ६ जून बंद राहणार पोर्टल
आयकरचे सध्या सुरू असलेले पोर्टल १ ते ६ जून दरम्यान संपूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात आयकर विभागात सुनवाई होणार नाही. तसेच विवरणपत्र भरले जाणार नाही. करदात्यांनी त्याआधीच आपली कामे उरकून घ्यावी, असा सल्ला सीए यांनी दिला आहे.
विवरणपत्र भरणे सुलभ होईल
पोर्टल संपूर्णपणे अद्ययावत असणार आहे. करदात्यांना काळानुरूप व सुलभ अनुभव देण्याकरिता नवीन पोर्टल तयार केले जात आहे. नि:शुल्क पोर्टलवर आयकर विवरणपत्र बनविण्याचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे कर कायद्याचे ज्ञान नसलेल्या करदात्यांनादेखील कर विवरणपत्र भरणे सुलभ होईल. हा सर्वांत महत्त्वाचा फायदा होय.
रोहन आचालिया, माजी अध्यक्ष, सीए संघटना, औरंगाबाद.