सहा जणींचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:49 AM2017-09-25T00:49:38+5:302017-09-25T00:49:38+5:30
तालुक्यातील कस्तुरवाडी येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या मामेबहिणीचा बुडून मृत्यू झाला. तर परतूर तालुक्यातील वाई येथे घडलेल्या दुसºया घटनेत हाकललेली वानरे दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तिसºया घटनेत एक वृद्धा दगावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर (जि. जालना) : तालुक्यातील कस्तुरवाडी येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या मामेबहिणीचा बुडून मृत्यू झाला. तर परतूर तालुक्यातील वाई येथे घडलेल्या दुसºया घटनेत हाकललेली वानरे दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तिसºया घटनेत एक वृद्धा दगावली.
कस्तुरवाडी येथे दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावाजवळील लाहुकी नदीत काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदी खोलीकरणाचे काम झालेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कपडे धूत असताना सायमा जुम्मेखॉ पठाण (१४) गजाला शेख मोईन (१९) व राणी उर्फ सुरया शेख मोईन (१३) तिघी पाण्यात पडल्या. त्यांनी एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने खोल पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये गजाला व सुरया या सख्ख्या बहिणी असून सायमा त्यांची मामेबहीण होती. या मुलींना वाचवायच्या प्रयत्नात सीमा शे शब्बीर (१३) हिचाही तोल गेला, मात्र ती सुदैवाने वाचली.
घटनेची माहिती मिळताच आ. नारायण कुचे, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र शिंदे, तहसीलदार प्रवीण पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोहोचले. गावातील समीर पठाण, अय्याज बेग, नौशाद बेग, अखतर पठाण, रऊफ बेग, युसूफ पटेल, सरवर बेग, भानुदास कोल्हे, आरिफ खान, शकील पठाण, अफजल बेग, भाऊसाहेब कोल्हे, अझहर खान पठाण यांच्या मदतीने मुलींचे मृतदेह बाहेर काढले. माजी आ. संतोष सांबरे यांनीही मदतकार्य केले. वरूडी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी भोकरदन ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विजय गायकवाड तपास करीत आहेत.
गावातील रऊफ बेग म्हणाले की, मी या तीन मुलींपैकी सायमा पठाण या मुलीस पाण्याबाहेर काढले. त्यावेळी तिचा श्वास सुरू होता, जर आम्हाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती ती वाचली असती.
यावर आमदार निधीतून रुग्णवाहिका देता येत नसेल तर मी वैयक्तिक निधीतून देईन, असे आश्वासन आ. नारायण कुचे यांनी ग्रामस्थांना दिले.
वाईत दोन बहिणींचा बुडून मृत्यू
परतूर : वडिलांनी झाडावरून हाकललेली वानरे विहिरीजवळ उभ्या असलेल्या दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत तोल गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मंठा तालुक्यातील वाई येथे रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. मृत बहिणींची नावे साक्षी गायकवाड (९) व मीनाक्षी गायकवाड (६) अशी आहेत.
केशव गायकवाड हे सकाळी अकरा वाजता शेतातील लिंबाच्या झाडावरील वानरे हाकलत होते. त्या वेळी साक्षी व मीनाक्षी शेतातील विहिरीजवळ उभ्या होत्या. झाडावरून हाकललेली वानरे विहिरीच्या दिशेने पळाली. यामुळे घाबरलेल्या दोघींचा विहिरीत तोल गेला.
वडिलांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. नंतर पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक के.के. शेख तपास करीत आहेत. साक्षी व मीनाक्षी या दोघी गावातील शाळेत जातात. रविवार असल्यामुळे त्या सकाळी वडिलांसोबत शेतात गेल्या होत्या. शेतात गेल्या नसत्या तर दोघी वाचल्या असत्या, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
भराडखेडा येथील वृद्धेचा मृत्यू
जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील वृध्देचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गट न ५७ मधे देवूबाई रामभाऊ मुळक (६०) या गवत कापत असताना त्यांचा विहिरीत पडुन मृत्यु झाला. कृष्णा मुरलीधर मुळक यांच्या खबरीवरून बदनापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .