पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:36 PM2017-10-30T23:36:30+5:302017-10-30T23:36:44+5:30
भोकरदन येथील घटना : संतप्त नागरिकांचा नगर परिषदेवर मोर्चा भोकरदन : शहरात सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला. काजीवेस परिसरात ...
भोकरदन येथील घटना : संतप्त नागरिकांचा नगर परिषदेवर मोर्चा
भोकरदन : शहरात सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला. काजीवेस परिसरात सहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून, पैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा काढून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
काजीवेस परिसरात फरहान जाकेर खान पठाण (२) व माजेद जाकेर खान पठाण (७) या सख्ख्या भावांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. तसेच ओम तळेकर (४) व अन्सार खान (१८) यांना चावा घेऊन जखमी केल्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला होता़
शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत नागरिकांनी नगर परिषदेला निवेदन दिले होते. मात्र नगर परिषदेने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. सोमवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान काजीवेस परिसरातील गल्लीमध्ये खेळत असलेल्या फरहान जाकेर खान पठाण याच्यावर कुत्र्याने हल्ला करून गालाचा लचका तोडला. भावाला वाचविण्यासाठी गेलेल्या माजेद जाकेर खान पठाणच्या डाव्या हाताला चावा घेतला. तसेच याच परिसरातील ओम तळेकर, अन्सार खान, अन्सार पठाण (१७) व द्वारकाबाई जाधव (६५) या चौघांनाही चावा घेऊन गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे काही जणांनी कुत्र्याला पिटाळले. त्यानंतर जखमींना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. अजय देशमुख, डॉ. अमोल मुळे, डॉ युसूफ खान यांनी औषध उपचार केले. पैकी गंभीर जखमी दोघा भावांना औरंगाबादला हलविण्यात आले. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून मुख्याधिकाºयांना धारेवर धरले. अगोदरच कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता, तर ही घटना घडली नसती असा मुद्दा शेख महेबूब, नईम कादरी, हबीबखॉ पठाण यांनी उपस्थित केला. या वेळी अनिस भारती, शेख बाबर, नाजेम खान, शेख रईस, सलमान खान, विनोद गायकवाड, समदाणी शहा, शेख कालू, जाकेर खान, रिजवान शेख निसार शेख आदी उपस्थित होते.
-------------
मुख्याधिका-यांनी दिली लेखी हमी
संतप्त नागरिकांची समजूत घालणे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांना कठीण झाले. त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन दिवसांत बंदोबस्त करू, अशी लेखी हमी दिली. तसेच नागरिकांनी आपले पाळीव कुत्रे स्वत: सांभाळावे, असे आवाहन केले. या वेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगरसेवक शेख कदीर, संतोष अन्नदाते यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.