औरंगाबाद जिल्ह्यात तीन अपघातात सहा जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:13 AM2018-12-20T00:13:21+5:302018-12-20T00:13:39+5:30
गोळेगाव, चितेगाव, माळीवाडानजीक दुर्घटना : मृतात डोंगरगावच्या पिता-पुत्राचाही समावेश
दौलताबाद/चितेगाव/गोळेगाव : औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतात सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावच्या पिता-पुत्राचाही समावेश आहे. गोळेगावनजीक अपघातात दोन, चितेगावनजीक दोन व माळीवाडाजवळील दुर्घटनेत दोन तरुण मित्र ठार झाले.यातील एकाची ओळख पटलेली नाही.
माळीवाड्याजवळ कंटेनरची कारला धडक
बुधवारी पहाटे ४ वाजता मुंबई-नाशिक महामार्गावरील माळीवाडा गावाजवळ ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील दोन जण जागीच ठार झाले. या अपघातात ठार झालेले दोघेही मित्र होते. औरंगाबादहून धुळ्याकडे जाणारा कंटेनर क्र. एनएल-०१-एसी -०६०५ व नाशिककडून औरंगाबादकडे जाणारी कार क्र. एमएच २३ -एडी -१६५४ यांच्यात एवढ्या जोरात धडक झाली की, कार अक्षरश: कंटेनरमध्ये जाऊन अडकली. कारमधील पराग रामचंद्र कुलकर्णी (३२, रा. तारांगण सोसायटी मिटमिटा, औरंगाबाद) व त्यांचा मित्र असे दोघे जागीच ठार झाले. त्यांच्या शरीराचा व कारचा चेंदामेंदा झाला. दुसऱ्या मृताची ओळख पटलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर साळवे, मोहंमद रफीक, खाजेकर, सचिन त्रिभुवन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचा अथक प्रयत्न केला; परंतु अपयश आले. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी व क्रेनच्या साहाय्याने पत्रा कापून पराग व त्याच्या मित्राला कारच्या बाहेर काढून सुनील गायकवाड व सतीश भिंगारे यांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाºयांनी दोघांनाही तपासून मयत घोषित केले. सदर घटनेची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कंटेनरचालक फरार आहे. पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे.
चितेगावजवळ कारने दुचाकीला उडविले
औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील चितेगावातील व्हिडिओकॉन कंपनीसमोर बुधवारी दुपारी दोन वाजता भरधाव कार व दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकीवरील दोन जण ठार झाले. दुचाकीस्वार सय्यद लाल गुलाब रसूल (६०, रा. शहाबाजार औरंगाबाद), सय्यद जहीर अब्दुल गफ्फार (५८, रा. बायजीपुरा औरंगाबाद) हे दोघे ठार झाले. भरधाव कार (एमएच-२० डीवाय ११८६) व दुचाकीचा (एमएच-२० डीएम ८४०४) समोरासमोर अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारच्या डाव्या बाजूचा पत्रा पूर्णपणे उखडला गेला, तर दुचाकीचा समोरील बाजूचा चुराडा झाला. बिडकीन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विठ्ठल आईटवार हे पुढील तपास करीत आहेत.
गोळेगावनजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडले
सिल्लोड तालुक्यातील गोळेगावनजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री वाजेच्या सुमारास औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील गोळेगावनजीक लिहाखेडी फाट्याजवळील एका ढाब्याजवळ घडली.
अपघातात ठार झालेल्या पित्याचे नाव पापाखान हैदरखान (६०), तर मुलाचे नाव शाहरुखखान पापाखान (२३, रा. डोंगरगाव, ता. सिल्लोड) असे आहे. हे पिता-पुत्र सोयगाव येथून काम आटोपून दुचाकीवर डोंगरगाव येथे जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला (क्र. एम.एच-२०. ईएक्स-०१५७) जोरदार धडक दिली. त्यात पिता-पुत्र जागीच ठार झाले. अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले. अजिंठा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अपघातप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
चौकट....
जळगाव -औरंगाबाद मार्गावरील अपघातात वाढ
जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे दोन्ही बाजूने रस्ता खोदलेला आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे, तसेच रस्त्याचे खोदकाम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याच धुळीमुळे वाहनधारकांना समोरून येणाºया वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळेच हा अपघात झाल्याचे नागरिकांनी सांगितले. यापूर्वीही धुळीमुळे मार्गावर अनेक अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.