सहा हजार लस खराब
By Admin | Published: August 5, 2014 11:52 PM2014-08-05T23:52:55+5:302014-08-06T00:00:07+5:30
गजानन वाखरकर, औंढा शून्य ते ५ वर्षे वयोगटातील मुलांच्या ६ हजार २५० लस ग्रामीण रूग्णालयामध्ये मुदतीपूर्वीच खराब झाल्याचे उघडकीस आले आहे.
गजानन वाखरकर, औंढा
शून्य ते ५ वर्षे वयोगटातील मुलांच्या ६ हजार २५० लस ग्रामीण रूग्णालयामध्ये मुदतीपूर्वीच खराब झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी तालुका आरोग्य विभागाकडून उसनवारी करून मुलांना लस देण्यात येत असल्याने आरोग्य विभागाचा गलथानपणा उघडकीस आला आहे.
मुलांना जन्मताच दिल्या जाणारे क्षय, ग्रोवर व पोलिओ या रोगप्रतिबंधक लस देण्यात येतात. त्यानंतर टप्याटप्प्याने घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात, कावीळ व विविध व्हिटामिन्सचे लसीकरण महिन्यातून प्रत्येक मंगळवारी करण्यात येते. या लस ठेवलेला फ्रीज दोन महिन्यांपूर्वी बंद पडला. त्यामध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात रोग प्रतिबंधक लस (डीपीटी) १५० बाटल्या, कावीळचा, ग्रोवर (एचबीएस) २२५ बाटल्या, ग्रोवर रोग प्रतिबंधक २५० बाटल्यांमध्ये लसीकरणाचा साठा होता. या औषधी थंड वातावरणात ठेवाव्या लागतात. त्यावर नियंत्रीत ठेवण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांनी नेमून दिलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे हा लसीकरणाचा साठा मुदतीपूर्वीच खराब झाला. सन २०१५-१६ मध्ये या लसी मुदतबाह्य होणार होत्या. मुलीचे व मातेचे आरोग्य निरोगी व्हावे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरून या रोग प्रतिकार लस प्रत्येक रूग्णालयांना जि.प. यंत्रणेमार्फत वितरीत केल्या होत्या. निष्काळजीपणामुळे अशा बहुमूल्य लस खराब होत आहेत.
लसीकरणासाठी फ्रीजमधील लस बाहेर काढल्या होत्या. हवामानातील बदलाने या लस लवकर वितळल्या नाहीत. त्यामुळे तालुका आरोग्य कार्यालयातून लसीकरणासाठी लस मागविल्या जात आहेत.
- डॉ. हरिष दराडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रूग्णालय औंढा.
अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा
प्रत्येक मंगळवारी ४० ते ६० बालकांना रोगप्रतिबंधक लस देण्यात येते. गरोदर मातांनाही धनुर्वाताचे लस देण्यात येते; परंतु लस खराब झाल्याने माता, बालक या लससाठी हिंगोली गाठावे लागते. खाजगी रूग्णालयात या लस मिळत नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना रिकाम्या हाताने परतावे लागते. आता उसनवारी करून ग्रामीण रूग्णालयातील कर्मचारी लसीकरण करीत असल्याची माहिती लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. एवढी गंभीर घटना असतानादेखील आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.