गर्भवतीसह सहा महिलांचा रात्री बसमध्येच मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 05:35 AM2018-12-06T05:35:07+5:302018-12-06T05:35:10+5:30
सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही बस मंगळवारी सायंकाळी शेलगाव-नाचनवेल रस्त्यावर निकामी झाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह ६ महिलांना चक्क रात्रभर बसमध्येच मुक्काम करण्याची वेळ आली.
औरंगाबाद : सोयगाव आगाराची औरंगाबाद-अंधारी-पाचोरा ही बस मंगळवारी सायंकाळी शेलगाव-नाचनवेल रस्त्यावर निकामी झाल्यामुळे एका गर्भवती महिलेसह ६ महिलांना चक्क रात्रभर बसमध्येच मुक्काम करण्याची वेळ आली. विशेष म्हणजे बस निकामी झाल्याचे आगाराला कळवूनही पर्यायी बस पाठविण्यात आली नाही.
औरंगाबाद स्थानकावरून दुपारी १ वाजता ही बस सुटली होती. ती ५ वाजता नाचनवेलहून निघाल्यानंतर निकामी झाली. चालक, वाहकाने बस सुरूकरण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळ झाली तरीही बस सुरू झालीच नाही. वाहक आर. एम. गाढे यांनी सोयगाव बस आगाराला दूरध्वनीवरून दुसरी बस पाठविण्याची विनंती केली. सिल्लोड आगार जवळ असल्याचे कारण सांगून सोयगाव आगारातील प्रमुखांनी सिल्लोडला दूरध्वनी केला व बस आणि दुरुस्ती पथकाला पाचारण करण्यास सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत सिल्लोड आगाराचे दुरुस्ती पथक आलेच नाही.
चालक, वाहकाकडून
माणुसकीचे दर्शन
बसमध्ये अडकलेल्या महिला प्रवाशांना चालक व वाहकाने पायी जाऊन स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून पिण्याचे पाणी व खाण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले.