१०५ ग्रामपंचायतींसाठी सोळाशे कर्मचारी तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:06 AM2021-01-15T04:06:32+5:302021-01-15T04:06:32+5:30
वैजापूर : तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामस्थ ...
वैजापूर : तालुक्यातील १०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामस्थ मतदान करू शकणार आहेत. तालुका प्रशासनाच्या वतीने १०५ गावांत १४०० मतदान अधिकारी, ३१ क्षेत्रीय अधिकारी, ३५ मास्टर ट्रेनर, १५० पोलीस कर्मचारी मतदान साहित्यासह गुरुवारी (दि.१४) रवाना झाले आहेत. प्रशासनाने ३० बस, ४० कारमधून ही व्यवस्था केलेली आहे.
वैजापुर तालुक्यात १०५ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सर्व ग्रामपंचायत मिळून एक लाख ७४ हजार २९६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात पुरुष मतदार ९४,१०७ व महिला मतदार ८०,१८९ आहेत. ३१४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, तर नऊ ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहेत. वीस प्रभाग मिळून २०४ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे ७०३ जागांसाठी १६३० उमेदवार नशीब आजमावित आहेत.
तहसीलदार राहुल गायकवाड, महेंद्र गिरगे, गटविकास अधिकारी डॉ. ज्ञानोबा मोकाटे, प्र. तहसीलदार निखिल धुळधर, नायब तहसीलदार रामेश्वर महाजन, रमेश भालेराव, दीपाली खेडकर, प्रशिक्षण प्रमुख धोंडिरामसिंह राजपूत, गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांच्या उपस्थितीत मतदान पथक रवाना करण्यात आले. पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, पोलीस नाईक संजय घुगे, शिऊर सपोनि सत्यजित ताईतवाले यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ही निवडणूक निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे. निवडणूक विभागातील पी. एफ. दुशिंग, संतोष जाधव, गणेश चौकडे, मास्टर ट्रेनर देवरे, बापू उगले, पारस पेटारे, जितेंद्र चापानेरकर यांचा सहभाग आहे.
-------------
फोटो कॅप्शन :