कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ जणांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 07:21 PM2020-07-23T19:21:18+5:302020-07-23T19:32:26+5:30
विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरूंच्या वाहनचालकासह १६ अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सव्वालाख विद्यार्थ्यांची परीक्षा या काळात कशी घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.
विद्यापीठात आठ दिवसांच्या लॉकडाऊनपूर्वीच कोरोनाने शिरकाव केला होता. दोन प्राध्यापक पॉझिटिव्ह आढळले होते. लॉकडाऊननंतर कोरोनाचा विळखा विद्यापीठाला पडला आहे. एका उपकुलसचिवांसह काही कंत्राटी कर्मचाऱ्यांची कोविड-१९ ची तपासणी केली असता पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याशिवाय कुलगुरूंच्या वाहनचालकासह इतर एक वाहनचालक पॉझिटिव्ह आढळला आहे. आतापर्यंत विद्यापीठात एकूण १६ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
मात्र, विद्यापीठ प्रशासनाने त्यास दुजोरा दिला नाही. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दोन प्राध्यापकांसह एक अधिकारी आणि इतर काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले, तसेच विद्यापीठ परिसर, मुख्य प्रशासकीय इमारत आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. याशिवाय तापमान तपासणी, सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. ज्याच्या टेबलवर काम आहे असे लोक येऊन काम करून जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी महापालिकेला अर्ज पाठवून विद्यापीठातील सर्वच कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्याची विनंती केली जाणार असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले. विद्यापीठात १५ टक्के कर्मचारी येत असताना, नियमांचे पालन केले जात असतानाही कोरोना होत आहे. या परिस्थितीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घेणार, असा सवाल विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केला आहे.
कुलपती, कुलगुरू असुरक्षित, तिथे विद्यार्थ्यांचे काय होणार
विद्यापीठाचे कुलपती राहत असलेल्या राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाला. आता विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या वाहनचालकाला कोरोना झाला. कुलपती, कुलगुरू सुरक्षित राहू शकत नाहीत, त्याठिकाणी कोणत्याही सुविधा नसणारा विद्यार्थी कसा सुरक्षित राहील. कुलपतींनी तर मुंबई सोडून नागपूरला मुक्काम हलवला आहे. त्यांना स्वत:ची काळजी वाटते. मग विद्यार्थ्यांची काळजी कोण घेणार आहे.
- डॉ. नीलेश आंबेवाडीकर, प्रवक्ता, युवक काँग्रेस
युजीसी, कुलपतींनी विचार करावा
विद्यापीठात सध्या १५ टक्के कर्मचारी कामावर येत आहेत. त्यातील १६ जणांना बाधा झाली. कामावर येणारे १०० पेक्षा कमी कर्मचारी सुरक्षित राहू शकत नाहीत, तर एकाच वेळी सव्वालाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्यास ते कसे सुरक्षित राहतील, याचा विचार युजीसी, कुलपती यांनी केला पाहिजे.
- डॉ. तुकाराम सराफ, विद्यार्थी सेना