जूनपासून ‘ऑरिक’मध्ये ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 07:49 PM2020-02-01T19:49:10+5:302020-02-01T19:49:51+5:30
स्थानिक उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा उद्देश
औरंगाबाद : औरंगाबादेतील उद्योगांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘आॅरिक’ सरसावले असून यासाठी ‘एआयटीएल ऑरिक स्किल फाऊंडेशन’ या नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली आहे. त्यासाठी आॅरिक सिटीमध्ये स्वतंत्र अडिच एकरचा प्लॉटही राखीव ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात या सेंटरच्या कार्यकारी संचालक मंडळाचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी सांगितले की, आॅरिकने ७ जानेवारी २०२० रोजी कंपनी कायद्याच्या कलम ८ अन्वये फौण्डेशनची नोंदणी केली आहे. औरंगाबादेतील शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत, वाळूज, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील, तसेच भविष्यात ‘डीएमआयसी’मध्ये येणाऱ्या उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची मोठी गरज आहे. ते उपलब्ध करून देण्यासाठी आॅरिकने राष्ट्रीय दर्जाचे ‘स्कील डेव्हलपमेंट सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सेंटरमध्ये उद्योगांच्या मागणीनुसार स्थानिक दहावी-बारावी तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या सेंटरच्या निर्मितीसाठी ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन’ने (एनएसडीसी) देखील रस दाखविला आहे. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीमध्ये राष्ट्रीय पातळीवरची शैक्षणिक संस्था लवकरच अस्तित्वात येणार आहे. यासाठी आॅरिक सिटीमध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या अडिच एकरच्या प्लॉटवर सुसज्य असे ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ची सुसज्ज इमारत उभारली जाईल. यासाठी काही केंद्र सरकारचा निधी, आॅरिकचा निधी, उद्योजक संघटना आणि सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) खर्च केला जाईल.
शुक्रवारच्या बैठकीत संचालकांची केली निवड
‘एआयटीएल आॅरिक स्किल फाऊंडेशन’ने केंद्र चालविण्यासाठी कार्यकारी मंडळाची स्थापना केली असून कैलास जाधव हे चेअरमन, तर भास्कर मुंढे हे संचालक आहेत. आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत व्हाईस चेअरमनपदी प्रसाद कोकीळ यांची निवड करण्यात आली आहे. संचालकपदी ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’ तसेच ह्युसंग, पर्कीन्स, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ‘एनएसडीसी’चा एक सदस्य अशा सहा जणांची निवड करण्यात आली आहे.
येत्या जूनपासून सुरू होतील केंद्राचे वर्ग
साधारणपणे जूनपासून ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’चे वर्ग सुरू केले जातील. ‘सीआयआय’, ‘सीएमआयए’ तसेच दिल्ली येथील उद्योजकांच्या संघटना हे केंद्र चालविण्यासाठी इच्छूक आहेत. यासंबंधी सोमवारी त्यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. त्यानंतर ‘एनएसडीसी’चे अधिकारी प्राप्त प्रस्तावांची छानणी करुन हे केंद्र चालविण्यासाठी योग्य प्रस्तावासंबंधी अंतीम निर्णय घेतील. जूनपासून ‘आॅरिक’ समोरील प्रोग्राम आॅफिसर यांच्या कार्यालयात या केंद्राचे वर्ग सुरू केले जातील. ‘स्कील डेव्हलपमेंट सेंटर’च्या उभारणीसाठी केंद्र सरकार व आॅरिकचा निधी, काही सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), तसेच उद्योजक संघटनाचा निधी खर्च केला जाणार आहे. कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योगांच्या मागणीनसार ‘एनएसडीसी’मार्फतच येथे सुरू होणाऱ्या ‘स्किल डेव्हलपमेंट सेंटर’चा अभ्यासक्रमही निश्चित केला जाणार आहे.