छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७०० बेरोजगार युवकांना देणार कौशल्य विकासाचे धडे
By साहेबराव हिवराळे | Published: May 23, 2024 07:37 PM2024-05-23T19:37:05+5:302024-05-23T19:38:00+5:30
सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी गरजूंना रोजगार व स्वयंरोजगार
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ७०० बेरोजगार युवकांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणार आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अंतर्गत मातंग समाज व तत्सम १२ पोटजाती कुटुंबांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी समाजातील गरजूंना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यांना व्यवसाय प्रशिक्षण आणि उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणीकृत आहे अशा प्रशिक्षण संस्थेने ३१ मेपर्यंत शासनाच्या नियमानुसार सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्तावाच्या दोन प्रतीत प्रस्ताव निकषानुसार सादर करावेत. प्रशिक्षणार्थींनी निवडलेल्या प्रशिक्षणाचे फी शुल्क कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने ठरवून दिलेल्या दरानुसार असेल. प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर, प्रशिक्षणार्थींना शासकीय नियमांनुसार आवश्यक त्या परीक्षेस बसविण्याची जबाबदारी संस्थाचालकाची असेल, त्याशिवाय संस्थेची फी अदा केली जाणार नाही.
प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार टप्प्याटप्प्याने प्रमाणात प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. जिल्हा स्तरावर एका अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण देण्यासाठी एकच प्रशिक्षण संस्था निवडली जाईल. अर्जदार हा मातंग समाजाचा आणि तत्सम १२ पोटजातींपैकी असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कार्यालयात ३१ मेपर्यंत सादर करावेत.
उद्योजकतेकडे वाटचाल....
गरजूंना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे.
- किसन पवार, जिल्हा व्यवस्थापक