ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुटले; सीईटीत अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:05 AM2021-07-31T04:05:31+5:302021-07-31T04:05:31+5:30
औरंगाबाद : राज्यभरातील महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला सुट मिळाली; मात्र सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू ...
औरंगाबाद : राज्यभरातील महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून औरंगाबाद शहराला सुट मिळाली; मात्र सीईटीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश करून घेत आहेत, तर शहरातील महाविद्यालयांची स्थिती ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेतून सुटून सीईटीत अडकल्यासारखी झाली आहे.
स. भु. कला, वाणिज्य महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय गायकवाड म्हणाले, ‘‘पालक विद्यार्थी प्रवेशाचा आग्रह धरत आहेत. सीईटीमुळे प्रवेश देता येत नाहीत. शहरात येऊन शिकू इच्छिणारे विद्यार्थी सीईटीमुळे गावात किंवा जवळच्या ग्रामीण भागात प्रवेश घेत आहेत, तर शहरातील विद्यार्थीही सीईटी देण्यापेक्षा शहरालगतच्या ग्रामीण महाविद्यालयाला पसंती देत आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सुटले आणि सीईटीत अडकले, अशी स्थिती महाविद्यालयांची झाली आहे. ’’
देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य रजनिकांत गरुड म्हणाले, ‘‘प्रवेशासाठी विचारपूस करायला विद्यार्थी येत आहेत. ग्रामीणसह काही महाविद्यालयात प्रवेशप्रक्रिया होत आहे. सध्या दहावीचे गुणपत्र व प्रमाणपत्रही विद्यार्थ्यांना मिळालेले नाही. अगोदर सीईटी देणारे व नंतर सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे सीईटी देण्यास इच्छुक नसलेले विद्यार्थी सरळ ग्रामीणमध्ये, क्लासेसशी सलग्न महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करत आहेत. प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेतली नसती, तर आठ दिवसांतच प्रवेश प्रक्रिया आटोपली असती व आता प्रत्यक्ष वर्गही सुरू झाले असते.’’