शहरातील आकाश अमृत मशीनचे होतेय भंगार..!
By Admin | Published: June 1, 2017 12:32 AM2017-06-01T00:32:01+5:302017-06-01T00:33:57+5:30
जालना : शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने बसविण्यात आलेल्या सर्वच आकाश अमृत मशीन बंद पडल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने बसविण्यात आलेल्या सर्वच आकाश अमृत मशीन बंद पडल्या आहेत. जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकीत्सक यासारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ग्रामणी भागातून येणाऱ्या ग्रामस्थांचे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या उद्देशाने स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्वंयसेवी संस्थासह कॉर्पोरेट कंपन्यांना विनंती करुन या अमृत मशिन्स शहरासह काही ग्रामीण भागात बसविल्या होत्या. कुठल्याही जलस्रोताच्या वापराविना थेट हवेतील आद्रता शोषून घेऊन ते पिण्यायोग्य बनविण्याचे तंत्रज्ञान असलेल्या तेरा आकाश अमृत मशीन जालना जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये जुलै २०१५ दरम्यान पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून बसविण्यात आल्या. या मशिनची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी त्या त्या शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. तसा करारही करण्यात आला. सुरुवातीला कुतूहल वाटणाऱ्या आकाश अमृत मशीनच्या पाण्याने अनेकांनी तहान भागवली. मात्र, काही महिन्यांतच आकाश अमृत मशीनचा वापर बंद झाला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात बसविण्यात आलेल्या तीनही आकाश अमृत मशीन बंदावस्थेत आहेत. परतूरमधील तहसील कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, शासकीय रुग्णालयात बसविण्यात आलेल्या मशीनही बंदच आहेत. मंठा, वाटूरमध्ये बसविलेल्या या मशीनची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून बसविण्यात आलेल्या या मशीन सध्या धूळखात आहेत.