आकाशकंदील, तोरण, पणत्या ग्राहकांच्या पसंतीस; अनाथाश्रमातील मुलींची कमाई लाखात
By साहेबराव हिवराळे | Published: November 17, 2023 08:25 PM2023-11-17T20:25:14+5:302023-11-17T20:25:22+5:30
या मुली आता स्वत:चा रोजगार उभा करण्याची हिंमत दाखवित आहेत.
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीला आकाशकंदील, तोरण, पणत्या, आदी साहित्य उत्कृष्टपणे बनवून भगवानबाबा बालिकाश्रमातील मुलींनी लाखाची कमाई केली. या मुली आता स्वत:चा रोजगार उभा करण्याची हिंमत दाखवित आहेत.
आश्रमातील मुली उच्च शिक्षणाबरोबरच कौशल्याचे प्रशिक्षण पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देत असून, स्पर्धा परीक्षांची देखील तयारी करीत आहेत. एकमेकांना साथ देत मेहनतीतून रोजगाराच्या संधी मिळविण्याचा संकल्प त्यांनी बाळगला आहे. काॅर्पोरेट सेक्टर, तसेच शासकीय क्षेत्रातील मोठे अधिकारीदेखील या आश्रमात तयार केलेले आकाशकंदील तसेच तोरण, दिवे, सजावटीचे साहित्य स्वत:हून खरेदी करीत आहेत. यंदाची दिवाळी जोरदार कमाई करून देणारी ठरली असून, सिम्बाॅयसिस, फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेण्यापर्यंत येथील काही मुलींनी मजल मारली आहे.
लायन्स क्लबच्या यंगर्स टीमच्या वतीने शैलेश खटोड आणि टीमने आश्रमातील मुलींना दिवाळीचे जेवण देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. आश्रमाच्या संचालिका कविता वाघ यांनी सांगितले की, कुणावर अवलंबून न राहण्याची व उद्योजक बनण्याची इच्छा मुलींमध्ये बळावली आहे.