२२२ वृक्षांची कत्तल
By Admin | Published: July 15, 2015 12:27 AM2015-07-15T00:27:39+5:302015-07-15T00:41:29+5:30
सोयगाव : येथून जवळच असलेल्या जि.प. सिंचन विभागाच्या पाझर तलावाच्या भिंतीवरील सुमारे २२२ डेरेदार वृक्षांची चोरटी वीज घेऊन कटरच्या साह्याने सोमवारी (दि. १३) कत्तल करण्यात आली.
सोयगाव : येथून जवळच असलेल्या जि.प. सिंचन विभागाच्या पाझर तलावाच्या भिंतीवरील सुमारे २२२ डेरेदार वृक्षांची चोरटी वीज घेऊन कटरच्या साह्याने सोमवारी (दि. १३) कत्तल करण्यात आली. महसूल व महावितरण विभागाला माहिती देऊनही वेळेवर घटनास्थळी न गेल्यामुळे ही झाडे तोडली गेली.
सोयगाव येथून जवळच अजिंठ्याच्या डोंगर पायथ्याशी रुद्रेश्वर पाझर तलाव आहे. जि.प. सिंचन विभागाच्या अखत्यारीतला हा पाझर तलाव आहे. या तलावाच्या भिंतीवरील अनेक वर्षाची डेरेदार वृक्ष आज पहाटेपर्यंत उभी होती; परंतु आज सकाळी महावितरणच्या विद्युत तारांवर आकडे टाकून कटर मशिनच्या साह्याने ही सुमारे २२२ झाडे काही तासात तोडण्यात आली. झाडे तोडली जात असताना काही वृक्षपे्रमी शेतकऱ्यांनी याबाबत ‘लोकमत’कडे माहिती दिली.
दुपारी वृक्षप्रेमी शेतकरी गणेश काळे, सुनील काळे, सुनील ठोंबरे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा सर्व झाडे तोडलेले होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना वृक्षतोडीचा पंचनामा करून संबंधीतावर कारवाई करण्याची मागणी केली; परंतु सर्वांनीच उडवाउडवीची उत्तरे दिली. महसूल, महावितरण व जि.प. सिंचन विभागाच्या डोळेझाकपणामुळे सदरील झाडांची कत्तल झाल्याचे दिसत आहे.