आरोग्य यंत्रणेवरील ताण किंचित हलका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:05 AM2021-04-19T04:05:16+5:302021-04-19T04:05:16+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत १५ एप्रिलपासून सुरू केलेल्या निर्बंधांमुळे शहरात दररोज सक्रिय रुग्णांची संख्या हळूहळू कमी ...
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने ब्रेक द चेनअंतर्गत १५ एप्रिलपासून सुरू केलेल्या निर्बंधांमुळे शहरात दररोज सक्रिय रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. रविवारी सायंकाळी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार शहरात आता फक्त ७ हजार ८३९ सक्रिय रुग्ण आहेत. १५ दिवसांपूर्वी सक्रिय रुग्णांची संख्या जवळपास १२ हजारांपर्यंत होती.
संचारबंदीतही अनेक नागरिक शहरात फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे अत्यावश्यक सेवेला वेळेची मर्यादा घालून देण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंतच आवश्यक साहित्य खरेदी करण्याची मुभा दिली आहे. मागील दोन दिवसांपासून शहरात याचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. रविवारी दुपारी १ वाजेनंतर शहरातील सर्वच रस्ते ओस पडले होते. संचारबंदीत बाहेर पडणाऱ्या नागरिकांची जागेवरच कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या निर्णयाचा परिणाम भटकंती करणाऱ्या तरुणांवर चांगला झाला आहे. पोलीस दिवसभर प्रमुख रस्त्यांवर गस्त घालून नागरिकांना घरी बसण्याची विनंती करीत आहेत. मागील वर्षी ज्या पद्धतीने लॉकडाऊन लावण्यात आला होता, तेत दृश्य रविवारी औरंगाबादकरांना पाहायला मिळाले. औरंगाबादकरांच्या संयमाचा परिणाम आता दिसू लागला आहे. रविवारी शहरात फक्त ६५६ बाधित रुग्ण आढळले.
शहरात आरोग्य यंत्रणेवरील ताणही किंचित हलका झाला आहे. घाटी रुग्णालयात मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या साडेपाचशेपेक्षा खाली येत नव्हती. रविवारी घाटीत ४९० रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १८५, शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये २ हजार ८२२, मेल्ट्रॉन हॉस्पिटल ३४९, कोविड केअर सेंटर १६४५, होम आयसोलेशनमध्ये २ हजार ३४८ रुग्ण आहेत. काही दिवसांपूर्वी होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या जवळपास ५ हजारांपर्यंत गेली होती.