आधार जोडणीचे काम मंदगतीने
By Admin | Published: March 20, 2016 01:11 AM2016-03-20T01:11:32+5:302016-03-20T02:13:12+5:30
परभणी : रेशनकार्डाला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात संथगतीने सुरू असून, वेळेत आधार क्रमांक लिंक न झाल्यास शासनाच्या योजनांपासून लाभधारक वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
परभणी : रेशनकार्डाला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात संथगतीने सुरू असून, वेळेत आधार क्रमांक लिंक न झाल्यास शासनाच्या योजनांपासून लाभधारक वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडण्याचा कार्यक्रम वर्षभरापूर्वी हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारक नागरिकांची अद्ययावत माहिती आॅनलाईन नोंदवून घेतली जाते. त्यात शिधापत्रिका धारकाचे नाव, सदस्यांची नावे, सर्व सदस्यांचे आधार क्रमांक, कुटुंबप्रमुख महिलेचा फोटो आणि कुटुंबप्रमुख महिला सदस्याचे बँक खाते क्रमांकाची नोंद घेतली जात आहे. परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड येथील एम.एस. कॉम्प्युटर अॅण्ड मल्टी सर्व्हिसेस या एजन्सीला हे काम देण्यात आले आहे. प्रतिशिधापत्रिका ५ रुपये या दराने एजन्सीला हे काम दिले असून एजन्सी आधार क्रमांकाची नोंदणी करुन घेत आहे. या अंतर्गत महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तलाठी आदी कर्मचाऱ्यांनी शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक, शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत आणि आवश्यक माहिती जमा करुन एजन्सीला देणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात १९ लाख ३ हजार ७६४ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी केवळ ११ लाख ३० हजार ४८३ शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेला जोडले आहेत. ही टक्केवारी केवळ ५९.६८ टक्के एवढी आहे. राज्यात शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडण्याच्या कामाला गती घेतली असताना परभणी जिल्ह्यात मात्र हे काम रखडले आहे. प्रशासकीय आणि नागरिकांची या कामात उदासिनता दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
अन्नसुरक्षा : परभणी जिल्हा राज्यात तिसरा
जिल्ह्यातील शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडण्याचे काम रखडले असले तरी याच जिल्ह्यातील अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत असलेल्या शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडण्याचे काम मात्र उल्लेखनीय झाले आहे. या कामाची राज्य- निहाय आकडेवारी प्राप्त झाली.
परभणी जिल्ह्यात अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील ९४.२८ टक्के लाभार्थ्यांचे शिधापत्रिका आणि आधार क्रमांक लिंक झाले आहेत.
या आकडेवारीच्या जोरावर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.