बजाजनगरात कर्जबाजारीपणामुळे लघु उद्योजकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:24 PM2019-02-14T13:24:25+5:302019-02-14T13:24:53+5:30

कर्जफेडीसाठी येणाऱ्या अपयशामुळे ते तणावात होते.

Small business owners commit suicide due to debt waiver in Bajajnagar | बजाजनगरात कर्जबाजारीपणामुळे लघु उद्योजकाची आत्महत्या

बजाजनगरात कर्जबाजारीपणामुळे लघु उद्योजकाची आत्महत्या

googlenewsNext

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज एमआयडीसीतील ३६ वर्षीय लघु उद्योजकाने बुधवारी बजाजनगरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. संजय विनायक पाटील, असे मृताचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

संजय विनायक पाटील (३६) हे बजाजनगरात पत्नी मीरा व दोन मुलांसह भाडेतत्त्वावर राहतात. त्यांचे वाळूज एमआयडीसीत शोभा इंजिनिअरिंग हे प्रेस शॉप आहेत. ते पत्नीसह बुधवारी सकाळी कंपनीत गेले होते, तर त्यांची मुले घरी होती. काही वेळानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडर घेऊन येतो, असे पत्नीला सांगून ते घरी गेले. 

यानंतर ११ वाजेच्या सुमारास मुले घरात आली असता त्यांना संजय घरातील छताच्या हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. शेजारील नागरिकांनी या घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच सहायक फौजदार राजू मोरे, आर.डी. वडगावकर, सोनाजी बुट्टे आदींनी संजय पाटील यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून संजय पाटील यांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, संजय पाटील यांनी व्यवसायासाठी एका बँकेकडून कर्ज घेतले आहे. 

कर्जफेडीसाठी येणाऱ्या अपयशामुळे ते तणावात होते. अशातच त्यांच्या कंपनीकडून झालेल्या मालाचा पुरवठ्याचे विविध कंपन्यांकडून बिले वेळेवर न मिळाल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या.  संजय पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र माहीत नसल्याचे  त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Web Title: Small business owners commit suicide due to debt waiver in Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.